म्हारळ : उल्हास नदीच्याप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच कांबा येथे नदीपात्रातील जलपर्णीत हजारो मासे मृत्युमुखी पडून सडा पडला आहे. मासे कुजल्यामुळे या परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. मासे मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच नदीतून स्टेम प्राधिकरण, केडीएमसी आणि एमआयडीसी पाणी उचलत असल्यामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलपर्णीमुळेच या परिसरात मासे मृत्युमुखी पडल्याचे सांगत लघुपाटबंधारे विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.नदीपात्राला जलपर्णीने अक्षरश: विळखा घातला आहे. या वनस्पतीमुळे पाण्यातील प्राणवायूच नष्ट झाल्यामुळे शिवरा, तेलप्पा (काळा मासा), करवली, मळे, शिमटे मासे मृत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या ठिकाणी जलपर्णीत या माशांचा अक्षरश: खच पडला आहे. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास ही समस्या आणखी उग्र रूप घेईल, अशी भीतीही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.याविषयी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी शहाड तसेच केडीएमसीमार्फत जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही वनस्पती प्रचंड वाढल्याने या कामाला विलंब होत आहे.दरम्यान, उल्हास नदीतून ठाणे जिल्ह्याची तहान भागवली जाते. नदीपात्रातून स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी तसेच केडीएमसी पाणी उचलते.स्टेम आणि एमआयडीसीकडून ठाणे, मीरा-भार्इंदर, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांना आणि कल्याण ग्रामीण परिसरात पाणीपुरवठा केला जातो. केडीएमसीने नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्याचे आवाहन केले असले, तरी लघुपाटबंधारे विभागाची अनास्था चिंतेचा विषय ठरत आहे.जलचरांच्या जीवावरलघुपाटबंधारे विभागातील नदीतील जलपर्णी वेळीच काढण्यात आली असती, तर माशांचा मृत्यू झाला नसता. या प्रकारामुळे नदी प्रदूषित होत असून जलचरांच्या जीवावर बेतत असल्याचे कांबाचे ग्रामस्थ पावशे यांनी सांगितले. नदीमध्ये जलपर्णी वाढल्याने कोळी, आदिवासींच्या मासेमारीवर परिणाम होत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे रायते गावचे ग्रामस्थ ज्ञानदेव जाधव यांनी सांगितले.
उल्हास नदीतील जलपर्णीत मृत माशांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:56 AM