अंबरनाथ: अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान एका महागड्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने गाडीतील दाम्पत्याने वेळीच गाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने ते दोघे थोडक्यात बचावले आहेत. मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. अंबरनाथ अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आहे.
अंबरनाथ हुतात्मा चौकातून स्वामी समर्थ चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच एका महागड्या कारमधून धूर येऊ लागल्याने या कारच्या चालकाने लागलीच गाडी भीतीपोटी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली. गाडीतील दांपत्य लागलीच तिथून निघून गेले. मात्र क्षणार्धात या गाडीने पेट घेतल्याने संपूर्ण गाडी आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आज विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. नेमकी या कारला आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेले नसले. तरी गाडीतील अंतर्गत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.