कल्याण : मोबाइल टॉवरच्या केबल जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या मशीन चोरणाऱ्या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. तपासात या चोरट्यांकडून हिललाइन, शिवाजीनगर आणि कल्याण तालुका आदी तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील प्रत्येकी एक असे तीन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली.
कैलास सावंत (३८), अकबर युसूफ शेख (३२), संजय सौदे (४५) अशी आरोपींची नावे असून, ते उल्हासनगरमध्ये राहणारे आहेत. केबल जॉइंट करण्याच्या महागड्या मशीनच्या चोऱ्या होण्याच्या घटनांमध्ये ठाणे जिल्ह्यात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर समांतर तपास करताना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते.
सहायक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुदगून, मोहन कळमकर, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिल्लारे, अजित राजपूत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, गुरुनाथ जरग, सचिन वानखेडे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा आदींच्या पथकाने डोंबिवलीतील रामनगर, कल्याण पूर्वेतील सूचकनाका आणि उल्हासनगर येथे सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांनी स्लायसिंग, ओटीडीआर, लेझर लाइट पॉवर मीटर अशा विविध कंपन्यांच्या महागड्या मशीन चोरल्याची कबुली दिल्याची माहिती जॉन यांनी दिली. सध्या या चोरट्यांना कल्याण तालुका पोलिसांच्या ताब्यात दिल्याचेही ते म्हणाले.
------------------------------------------------------