- पंकज पाटील अंबरनाथ : तालुक्यातील एक प्रयोगशील शेतकरी अनुभव मांजरेकर यांनी त्यांच्या शेतात चक्क स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. बदलापूरजवळील बेंडशीळ गावातील शेतात हा प्रयोग यशस्वी केला आहे. मांजरेकर यांनी महाबळेश्वरची ओळख असलेल्या स्ट्रॉबेरीचे पीक येथील लहरी हवामानातही घेण्याची किमया साधली असून बदलापूरची स्ट्रॉबेरीही नावारूपास आल्यास आश्चर्य वाटणार नाही.
थंड हवामानातील फळ म्हणून स्ट्रॉबेरीकडे पाहिले जाते. प्रयोगशील शेतकरी असलेल्या मांजरेकर यांचा कोणत्या मातीत काय पिकेल, याचा चांगला अभ्यास आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या बदलापुरातही स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येईल, हे त्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले होते. प्रत्यक्षात उत्पादन येणार की नाही, याची शाश्वती कोणालाच वाटत नव्हती; मात्र मांजरेकर यांनी बदलापूरजवळील बेंडशीळ या गावात अवघ्या अडीच गुंठे जागेत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे.
त्यांनी स्ट्रॉबेरीचे हे वाण परदेशातून मागवले. हे वाण कोकण पट्ट्यातील वातावरणात तग धरेल, याचा मांजरेकर यांचा अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्या रोपट्यांचे योग्य संगोपन केल्यावर आता या शेतात रसाळ लालबुंद स्ट्रॉबेरी लगडली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांनी भविष्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. या उत्पादनासंदर्भात इतर शेतकऱ्यांनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
थंड हवामानात येणारी स्ट्रॉबेरी आता अंबरनाथ तालुक्यातही यशस्वी झाल्याने ही स्ट्रॉबेरी चर्चेचा विषय ठरत आहे. मांजरेकर यांचा हा प्रयोग सर्वांना नवलाईचा असला, तरी या भागातील पारंपरिक शेतीला नवीन दिशा देणारे ठरत आहे.स्ट्रॉबेरीचे उत्पादन अंबरनाथ तालुक्यात घेतले, असे म्हटले तर इतरांना ते खरे वाटणार नाही. मात्र, आपण सेंद्रिय पद्धतीने योग्य प्रकारे स्ट्रॉबेरीची शेती करू शकतो, हे माझ्या शेतात स्पष्ट झाले आहे. आता इतर शेतकºयांनीही त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.- अनुभव मांजरेकर, शेतकरी