ठाणे : मागील कित्येक वर्षांपासून कागदावर असलेला मुंबई - नाशिक महामार्गावरील बाळकुम ते घोडबंदरमधील गायमुख चौपाटीपर्यंतचा कोस्टल रोड आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे महापालिकेने या रस्त्याचा आराखडा तयार करुन एमएमआरडीएकडे पाठवला आहे. याकामी आता पर्यावरण विभाग आणि इतर विभागांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या कामासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी १ कोटी ६८ लाखांचा खर्च करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्तावावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत विचारविनीयम होणार आहे.
घोडबंदरमधील मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होऊन कोंडी सुटण्यास कोस्टल रोडमुळे मदत होणार आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक सोडली जाणार आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये घोषणेपलीकडे काहीच झाले नव्हते. दरम्यान, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या प्रकल्प आराखड्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार केला असून, तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे पाठवला आहे. हा मार्ग सुमारे १३ किमीचा आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार हा ४० ते ४५ मीटरचा आठ पदरी रस्ता आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका राहणार आहे. १.१३ किमीचा उन्नत मार्ग, ५०० मीटरचा भुयारी मार्ग, तसेच वाघबीळ भागात जाण्यासाठी मार्गिका राहणार आहे. एकूण मार्गापैकी ७.२९ किमीचा मार्ग सीआरझेड भागातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.