उल्हासनगर : कोरोना रुग्णांसाठी आणलेली एक्सपायरी डेट संपलेली (मुदतबाह्य) बिस्किटे व किडे पडलेल्या खिचडीचा टेम्पो महापालिका मुख्यालय प्रांगणात भाजप, मनसे पदाधिकारी यांनी रविवारी सायंकाळी पकडला. महापालिकेने याबाबत कानांवर हात ठेवले असून शिवसेना, भाजपने महापालिकेवर टीका करत चौकशीची मागणी केली आहे.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांना खाद्यपदार्थ देण्यासाठी जाणारा टेम्पो भाजप व मनसे पदाधिकाऱ्यांनी रविवारी पकडला. या टेम्पोमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण आणि मुदतबाह्य बिस्किटे आढळून आल्याने अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांना निश्चित माहिती देता आली नाही. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी टेम्पोचालकाकडे महापालिकेविषयी कागदपत्रे नसल्याने, ते साहित्य महापालिकेचे नाही, असे स्पष्ट केले. मात्र, साहित्य महानगरपालिकेचे नाही, तर टेम्पो पालिकेत आलाच कसा, असा पवित्रा भाजप व मनसेने घेऊन टेम्पो पालिका प्रांगणात उभा करून ठेवला.
स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी आक्रमक भूमिका घेऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचा आरोप केला. पक्षाचे पदाधिकारी कपिल अडसूळ यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून टेम्पोचालकासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसे पत्र त्यांनी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना दिले. माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चौकशीची मागणी करून पालिकेच्या कारभारावर टीका केली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही याबाबत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
महानगरपालिकेवर टीका : अशाच निकृष्ट खाद्यपदार्थांची पाकिटे यापूर्वी आली होती, असा गंभीर आरोप स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी केला. महापालिकेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महापालिका ठेकेदारासह अन्य जणांना पाठीशी घालत असल्याचीही टीका त्यांनी केली.