कल्याण : वाडेघर परिसरात दगडाने ठेचून हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. लताबाई गवई असे तिचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी ज्ञानेश्वर पाटील (३२) याला सापर्डे गावातून अटक करण्यात आली आहे. आईवरून शिवी दिल्याने लताबाईची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, अशीही माहीती उघड झाली आहे. ज्ञानेश्वर हा एका खाजगी शाळेत बसचालक आहे. तर लताबाई ही मोलमजुरी करत असत.वाडेघर परिसरातील निळकंठ सृष्टीजवळील मोकळ्या मैदानात पत्र्याच्या कंपाउंडजवळ शनिवारी सकाळी १० च्या सुमारास एका महिलेचा दगडाने डोके ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा आरोपीने सोडलेला नव्हता. केवळ त्या महिलेच्या उजव्या हातावर सुनील, असे नाव गोंदलेले असल्याचा एकमेव पुरावा पोलिसांकडे होता. या महिलेची ओळख पटवण्यासाठी तसेच हत्येची माहिती देणाºयास खडकपाडा पोलिसांनी १० हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. मात्र, या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखेचे पोलीसही करीत होते. महिलेच्या हातावर गोंदविलेल्या नावावरून संबंधित पोलिसांनी तपास सुरू केला. यात त्यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून लताबाई ही सापर्डे गावात पूर्वी राहत असल्याचे समजले. त्यादृष्टीने अधिक तपास करताना तिचे सापर्डे परिसरात राहणाºया ज्ञानेश्वर पाटील याच्यासोबत अनैतिक संबंध होते. पोलिसांनी ज्ञानेश्वरला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने लताबाईची हत्या केल्याची कबुली दिली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाला या हत्येचा उलगडा करण्यात यश आले. गुन्हे शाखेने ज्ञानेश्वरला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.मरण न आल्याने दगडाने ठेचलेशुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर आणि लताबाईची सापर्डे गाव येथील पाटील चायनीज कॉर्नर येथे भेट झाली. त्यानंतर दोघांनी मिळून मद्य प्राशन केले. त्या नशेत त्यांच्यात आपसात वादावादी होऊन शिवीगाळी झाली. यात लताबाईने ज्ञानेश्वरला आईवरून शिवी दिली. याचा प्रचंड राग त्याला आला. दरम्यान घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिला मोटारसायकलवर बसविले आणि वाडेघर गावाच्या निळकंठसृष्टी इमारतीजवळील मोकळ््या जागेत नेले. आईवरून शिवी देणाºया लताबाईला संपवायचेच, असा चंग बांधलेल्या ज्ञानेश्वरने प्रथम तिचा गळा आवळला. परंतु, तिला मरण न आल्याने अखेर तिचे डोके दगडाने ठेचून तिची हत्या केली.‘ती’ मूळची बुलडाण्याचीलताबाई बुलडाणा येथील रहिवाशी असून मोलमजुरीसाठी ती कल्याणला आली होती. तिचे लग्नही झाले आहे. परंतु, तिचा पती महादेव हा एका खुनाच्या गुन्ह्यात अमरावती येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. लताबाई ही सुनील नावाच्या व्यक्तीबरोबर राहत होती. त्याचच नाव तिने हातावर गोंदविले आहे. परंतु, त्याचा या हत्येच्या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याची माहिती जॉन यांनी दिली. ज्ञानेश्वर बरोबर तिचे अनैतिक संबंध होते आणि शिवीगाळ केल्याच्या रागातून ज्ञानेश्वरने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे जॉन यांनी सांगितले.
आईवरून शिवी देणे बेतले जीवावर, आरोपी गजाआड : महिलेच्या हत्येचा उलगडा, अनैतिक संबंध असल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 1:51 AM