ठाणे - बदलापूर परिसरात असणाऱ्या एमआयडीसीतील कंपनीत आज सकाळी ९ च्या सुमारास जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले.
एमआयडीसीतील के जे रेमेडिज नावाच्या कंपनीत ही घटना घडली. सकाळच्या सुमारास कंपनीतील ड्रायरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे काही भागात आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आलं असून स्फोटातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
बदलापूर येथील के जे रेमेडीज या कंपनीत ड्रायरचा स्फोट झाल्याने त्या ठिकाणी काम करणाऱ्या विष्णू धडाम या ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे. याच ठिकाणी काम करणाऱ्या विजय पिंग्वा हा 20 वर्षीय तरुण 90 टक्के भाजला आहे. झागरा मोहतो हे 56 वर्षे कामगार 80 टक्के भाजले आहेत, तर त्यांच्यासोबतच काम करणारा विनायक जाधव या 55 वर्षीय कामगाराला देखील या स्फोटाचा फटका बसला असून ते देखील 40 टक्के भरले आहे. या तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना बदलापूरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे ऐरोलीच्या बर्न सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे. या कंपनीमध्ये रासायनिक पदार्थांवर प्रक्रिया करून त्याची ड्रायरमध्ये पावडर तयार करण्याचे काम सुरू होते. या ड्रायरमध्ये प्रचंड दाब वाढल्याने त्या ड्रायरचा स्फोट झाल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे.
ड्रायरच्या परिसरातच काम करणारे चारही कामगार गंभीररीत्या भाजले होते. त्यातील विष्णु यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झालेले कामगार बाहेर पडले त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र त्यात तीन गंभीर जखमी पैकी दोन जण 80 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने त्यांना मृत्यूशी सामना करण्याची वेळ आली आहे.