कल्याण : पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील जागृती इमारतीच्या गच्चीवर इंटरनेट केबलची वायर टाकण्यासाठी गेलेल्या तरुणाने वायर फेकताच ती नजीकच्या टाटा पॉवर कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने मोठा स्फोट झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. या घटनेत वायर टाकणारा अमोल भोर जखमी झाला आहे. त्याचा हात भाजला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या स्फोटामुळे जागृती परिसरातील १२ फ्लॅटधारकांच्या घरातील विजेची उपकरणे जळाली आहेत. भोर हा ‘स्कायनेट’ या केबलनेट आॅपरेटर कंपनीत काम करतो. तो वायर टाकण्यासाठी चार मजली जागृती इमारतीच्या गच्चीवर चढला होता. त्याने वायर गच्चीवरून खाली टाकली असता ती नजीकच्या टाटा पॉवरच्या अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली. या वेळी शॉर्टसर्किट होऊन मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यामुळे दीड किलोमीटरचा परिसर हादरला. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. जागृती इमारतीतील रहिवाशांनी सांगितले की, केबलची वायर टाकण्यापूर्वी परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र, ती घेतलेली नाही. त्यामुळे आमच्या जिवाला धोका निर्माण झाला. या स्फोटामुळे इमारतीत राहणारे महेश चौधरी, सुधाकर गांगुर्डे, पुंडलिक बारस्कर, राजेश पुराणिक, सुरेश शुक्ला यांच्यासह १२ जणांच्या घरातील वीज उपकरणांचे नुकसान झाले. (प्रतिनिधी)दोन मुलेही जखमी या परिसरात एका खोलीत जजाबाई कांगणे या ८० वर्षांच्या आजी राहतात. स्फोटामुळे एक दगड उडून त्यांच्या घराच्या सिमेंटच्या पत्र्यावर पडला. हा दगड पत्रा भेदून घरात आला. मात्र, आजी या घटनेत बचावल्या आहेत. त्या रोज ज्या जागेवर पडून असतात, त्या जागेवर त्या बसलेल्या नसल्याने त्यांना दगड लागला नाही. या आजींची देखभाल या परिसरातील नागरिक करतात. तसेच माहेरी आलेल्या कुंतल चौधरी यांच्या घरातील स्वीच बोर्डातून तुकडा उडून त्यांची दोन मुले जखमी झाली.
केबलची वायर टाकताना स्फोट
By admin | Published: April 30, 2017 3:09 AM