कल्याण : सध्या अन्न धान्याच्या गोदामावर धाडी टाकून साठेबाजीची प्रकरणे शिवसेना-भाजपा सरकार बाहेर काढीत असली तरी या साठेबाजीला या सरकारनेच गेल्या सहा महिन्यात उत्तेजन दिले आहे. व्यापाऱ्याने किती माल गोदामात ठेवावा याबाबत आमच्या आघाडी सरकारने निर्बंध घातले होते. परंतु, सध्याच्या सरकारने ते उठविल्याने ही परिस्थिती ओढावली असून अन्न धान्याचा काळाबाजार करणारे युतीचे सरकार हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी डोंबिवलीत केले.काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कुठे ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी स्थिती सध्या राज्याची झाली आहे. अन्नधान्याचे भाव गगनाला भिडले आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. यात आता शालेय विद्यार्थीदेखील आत्महत्या करू लागले आहेत. ज्यांना राज्याचे प्रश्न समजत नाहीत अशा लोकांच्या हातात आज सत्ता आहे. महाराष्ट्र दिशाहीन झाला असून अच्छे दिन आम्हाला दाखविले नाही तरी चालतील. परंतु, आमचे मागचेच चांगले दिवस पुन्हा आणा असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचाराच्या चौकशीचे धाडस दाखविणार का?गेली साडेसतरा वर्षे केडीएमसीत सत्ता भोगणाऱ्या युतीने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या भाजपाने भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. धर्माच्या नावाखाली मते मागणाऱ्या शिवसेना भाजपाने सुसंस्कृत शहरांची कशी वाट लावली हे आज येथील जनता अनुभवत आहे. शहरे जेव्हा विस्तारतात तेव्हा पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे असते. परंतु, येथे सत्ता भोगणाऱ्यांचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले.
धान्याचा काळाबाजार करणारे सरकार हद्दपार करा
By admin | Published: October 28, 2015 12:48 AM