डोंबिवली: अनलोकडाऊनमुळे रेल्वे सेवा ऑक्टोबरपर्यन्त, आणि शाळा व महाविद्यालये डिसेंबर पर्यंत सुरळीत सुरु होणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत रिक्षाचालकांचा व्यवसाय होणार नाही. हे लक्षात घेवून रिक्षाचालकांनी घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी असणारी मुदत डिसेंबर अखेर पर्यंत वाढवावी, अशी मागणी भाजपप्रणित रिक्षा चालक मालक युनियनच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
रिक्षाचालकांना कर्ज वसुलीसाठी बँका, वित्तीय संस्थाकडून होणारा त्रास थांबवावा. त्या मागणीचा राज्य शासनाने गंभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा जाहीर आमरण उपोषणबकरण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीतील हजारो रिक्षाचालकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नवीन रिक्षा घेण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले .मात्र कोविड प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च महिन्यापासून गेले पाच महिने राज्यात लॉक डाऊन होता . त्यामुळे रिक्षा व्यवसाय बंद राहिला होता . त्यावेळी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी ३ महिन्यांची सवलत जाहीर केली होती .
कोणत्याही कर्जदाराला थकीत कर्ज वसुलीसाठी त्रास देवू नये ,असे स्पष्ट बजावले होते .मात्र या दरम्यान देखील खाजगी वित्त संस्था थकीत कर्ज असलेल्या रिक्षाचालकांना नाहक त्रासाचे सत्र सुरू असून रिक्षाचालक नैराश्येत आहेत. आता जरी अनलॉक झाले असले तरी सर्व उद्योग व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत .तसेच उपनगरी रेल्वे सेवा आणि शाळा महाविद्यालये अजूनही बंदच असल्याने रिक्षाचालकाना प्रवासी मिळत नाहीत . कल्याण डोंबिवलीत कोविडचा प्रादुर्भाव अजूनही ओसरला नसून बहुतांशी भाग हे कंटेंटमेन्ट झोन आहेत. त्यातच फिजिकल डीस्टसिंगचे नियमामुळे प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ फिरवली असल्याने अपेक्षेप्रमाणे रिक्षाचालकांचा व्यवसायच होत नाही .
सध्याच्या व्यवसायातून इंधनाचे पैसे देखील मिळत नाही, अशी स्थिती आहे. जोपर्यंत रेल्वे आणि शाळा महाविद्यालये सुरु होत नाहीत तोपर्यंत रिक्षा व्यवसाय खऱ्या अर्थाने सुरु होणे शक्य नाही . त्यामुळे कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी बँका व वित्तीय संस्थांनी रिक्षाचालकांना नाहक त्रास देवू नयेत ,असे आदेश द्यावेत . तो त्रास आगामी १५ दिवसात थांबला नाही तर मात्र ठिकठिकाणी आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल अशी माहिती पक्षाचे कल्याण जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिली.