ठाणो : महापालिकेच्या बाळकुम येथील कोविड रुग्णालयात बोगस डॉक्टरांच्या नियुक्तीचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही त्यांची नियुक्ती करणाऱ्या कंपनीला मुदतवाढ देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी केला. ठाण्यातील एका बड्या नेत्याकडून यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुंबईतील एका कंपनीला रुग्णालयासाठी नियुक्ती करण्याचा ठेका दिला होता. या कंपनीने प्रशिक्षित व अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नियुक्ती करणे अपेक्षित होते. मात्र, बोगस डॉक्टरांची नियुक्ती केली. तरीही एका नेत्याच्या आशीर्वादातून तिला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला असून, या प्रस्तावाला भाजपचा तीव्र विरोध आहे. या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यांच्यासाठी पुन्हा रेड कार्पेट टाकले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.