ठाणे : वक्तृत्व ही अशी कला आहे की जी शिकू शकता पण कोणी शिकवू शकत नाही. चांगले बोलण्यासाठी विषयाचे ज्ञान हवे आणि ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यासाठी वाचनसोबत नवनवीन साधने वापरा, असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी ५१व्या कै. नि. गो. पंडितराव राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले.
पंडितराव स्पर्धेतील आजवरच्या विजेत्यांची नावे वाचली तरी या स्पर्धेच्या व्यापकतेची कल्पना येते. वक्ते घडवण्यासाठी स्पर्धा आणि बरोबरीनेच कार्यशाळा आयोजित करणे या गोष्टी कौतुकास्पद असल्याचेही मांडलेकर म्हणाले. मांडलेकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यंदा मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर आधी भागातून आलेल्या ७० महाविद्यालयीन विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. निवृत्त मुख्याध्यापिका रोहिणी रसाळ, पत्रकार मुकुंद कुळे, अॅड. प्रमोद ढोकळे, अभिनेत्री-लेखिका हर्षदा बोरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या सोहळ्यात मंडळाचे प्रमुख अनिल हजारे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. स्पर्धा समितीचे प्रमुख डॉ. चैतन्य साठे यांनी मांडलेकर यांचा परिचय करून दिला. समिती सदस्य योगेश भालेराव यांनी परितोषकांचे वाचन केले आणि पौर्णिमा जोशी यांनी आभार प्रदर्शन केले. तर रवींद्र मांजरेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . कार्यकारी विश्वस्त उल्हास प्रधान, विश्वस्त प्रफुल्ल प्रधान, सरचिटणीस निशिकांत साठे, समिती सदस्य प्रमोद कुळकर्णी आणि नंदिनी लागू व्यासपीठावर उपस्थित होते.
----------------------------------------------
स्पर्धेत पुण्याची बाजी
पदवी गटात पुण्याच्या सुजित काळंगे या संस्कार संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांने तर कनिष्ठ गटात स.प. महाविद्यालयाच्या पराग बद्रिके याने प्रथम क्रमांक पटकावला. पदवी गटात प्रतीक पवार (रुईया महाविद्यालय, मुंबई) याला दुसरे, विशाखा गढरी (सी. एच. एम महाविद्यालय, उल्हासनगर) हिला तिसरे तर शुभम कदम (मुलुंड वाणिज्य महाविद्यालय, मुंबई) याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. कनिष्ठ गटात मधुरा लिमये (रुईया महाविद्यालय, मुंबई) हिला दुसरे, श्रुती बोरस्ते (एस. पी. टी महाविद्यालय, नाशिक) हिला तिसरे तर रवींद्र शिंदे ( मॉडर्न महाविद्यालय, पुणे) याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या शिवाय नियोजित आणि उत्स्फूर्त या दोन प्रकारात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या अपूर्वा फडके ( आय.सी. टी, मुंबई) आणि सिद्धी करकरे (मॉडर्न महाविद्यालय, पुणे) यांना विशेष पारितोषिक देण्यात आले.