लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या व बालकाच्या घराजवळ असलेल्या ६६९ शाळांमध्ये यंदा आरटीई म्हणजे शिक्षणाचा हक्क कायद्याखाली २५ टक्के प्रवेश दिले जात आहेत. आता प्रतिक्षा यादीतील एक हजार ८९४ विद्यार्थ्यांची या प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यांना २३ आँक्टोबरपर्यंत दिलेल्या शाळेत प्रवेश घ्यायचा होता. मात्र फक्त ७१८ बालकांनी या मुदतीत प्रवेश घेतले. तर उर्वरित एक हजार १७३ बालकांना २९ आँक्टोंबरपर्यंत प्रवेश घेण्याची वाढीव मुदत देण्यात आली आहे.
या आरटीई कायद्याखाली निवड झालेल्या या बालकांना पहिली ते सीनिअर केजी म्हणजे पूर्व प्राथमिक या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. लाँटरी सोडत द्वारे निवड झालेल्या नऊ हजार ३२६ बालकांपैकी दिलेल्या मुदतीत पाच हजार ६७७ बालकांनी प्रवेश घेतले आहेत. यानंतर आता प्रतिक्षा यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीनंतर ही आता वाढीव मुदत देऊन प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना प्रवेश घेण्याची शाळा एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे.
या शालेय प्रवेशासाठी संधी देऊन लाँटरी सोडतमधील तीन हजार ४९७ बालकांनी दिलेल्या शाळेत जाऊन प्रवेश घेतलेले नाही. आताही प्रतिक्षा यादीतील एक हजार १७३ बालकांनी प्रवेश घेतलेला नाही. या बालकांच्या पालकांनी तत्काळ शाळेत जाऊन प्रवेश घेणे आवश्यक आहे. पालकांनी एसएमएसची वाट न पाहता पालकांनी पोर्टलवर जाऊन प्रवेशाचा दिनांक येथे प्रवेश अर्जाचा क्रमांक टाकून प्रवेश घेण्या च्या दिनांकची माहिती करून घ्यावी आणि त्वरीत संबंधीत शाळेत जाऊन बालकाचा प्रवेशघेण्याचे आवाहन केले आहे.
प्रवेश न घेतलेले अंबरनाथ तर - १४५ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी मनपा क्षेत्रातील १४६, भिवंडी तालुक्यातील ११, कल्याणचे -६६८, केडीएमसी क्षेत्रातील १०६, नवी मुंबईचे ३६६, शहापूरचे ३३, मीरा भाईंदरचा एक, ठाणेचे २६१ आणि उल्हासनगरच्या ३६ बालकांचा प्रवेश २९ आँक्टोंबरपर्यंत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.