बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम झालेले असले तरी त्या धरणामुळे बाधित झालेल्या १२०४ कुटुंबांचे पुनर्वसन न झाल्याने गतवर्षी या धरणात अतिरिक्त सहा मीटर पाणी साठवणे शक्य झाले नव्हते. मात्र गेल्या वर्षभरात बारवी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे एमआयडीसीने लक्ष केंद्रित करुन प्रकल्पग्रस्तांना जागा आणि घर उभारण्यासाठी मोबदला दिल्याने त्यांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे यंदा बारवी धरणात २३४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्या ऐवजी ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे.
मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, कोळे-वडखळ आणि मोहघर येथील १२०४ कुटुंबांच्या पुनर्वसन प्रश्नावरुन धरणाची उंची सहा मीटरने वाढूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. मात्र गेल्या वर्षभरात बहुतेक प्रकल्पबाधितांना त्यांच्या घरांचे मूल्यांकन, पर्यायी जागा देण्यात आल्या असून शेकडो कुटुंबे त्यांना दिलेल्या जागेत स्थलांतरीत झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली काळू आणि शाई हे धरण प्रकल्प अद्याप मार्गी लागू शकले नाहीत. त्यामुळे सध्या तरी ठाण्यातील शहरांना वाढीव पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणाचे विस्तारीकरण हाच पर्याय आहे. दिवसेंदिवस पाण्याची गरज आणि पुरवठा यात येणारी तूट वाढू लागली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठयाचा गंभीर प्रश्न लक्षात घेता गेल्या वर्षभरात युद्ध पातळीवर कामे करण्यात आली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या थेट घरोघरी जात त्यांच्याशी संवाद साधला. पुनर्वसन भरपाईविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी त्यासाठी गावकऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. गावात जाऊन लोकांना धनादेश दिले. पर्यायी जागांवर गावठाण विकसीत करून दिले. शाळा, समाजमंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते बांधले. या सर्व सुविधा मिळताच आता प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या जागांवर आपले घर बांधण्याचे काम सुरु केले आहे.
तोंडली आणि काचकोली येथील रहिवाशांचे तोंडली-१, तोंडली-२ आणि कोचकोली-१ आणि कोचकोली-२ अशा प्रत्येकी दोन ठिकाणी पुुनर्वसन करण्यात आले आहे. पाच सदस्य असलेल्या कुटुंबाला ३७० चौरस मीटरचा भूखंड किंवा ६ लाख ६५ हजार रूपये देण्यात आले. पाचपेक्षा अधिक कुटुंबसंख्या असलेल्या कुटुंबांना ७४० चौरस मीटरचा भूखंड किंवा १३ लाख ३० हजार रूपये देण्यात आले. तोंडली, काचकोली येथील शेकडो कुटुंबांनी पुनर्वसन पॅकेज स्वीकारले असून ते पर्यायी जागेत स्थलांतरीतही झाले आहेत.
काही घरांची कामे सध्या सुरू असून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नव्या घरात रहायला जातील. तोंडली १ आणि २ ही गावठाणे मुरबाड-म्हसा रस्त्याच्या दुतर्फा स्थलांतरीत झाली आहेत. काचकोलीवासियांना मोहघरच्या दिशेला जागा देण्यात आल्या आहेत. तिथे घरांची कामे पूर्ण करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
काही कुटुंबांचे पुनर्वसन बाकीकोळे-वडखळ गावाला पुनर्वसनासाठी दिलेली जागा वन विभागाची असल्याने तेथील शंभर कुटुंबांचा प्रश्न प्रलंबीत आहे. त्याचप्रमाणे तोंडली गावातील काही कुटुंबांच्या घरांचे फेरमूल्यांकन केले जात आहे. तोंडलीत अजूनही २८६ कुटुंबे विस्तारीत धरण प्रकल्पाच्या कक्षेत आहेत.
त्यापैकी ९९ कुटुंबांनी पुनर्वसन पॅकेज स्वीकारले आहे. ते लवकरच स्थलांतरीत होतील. तर उर्वरित १८७ जणांना तोंडली-१ आणि तोंडली-२ मध्ये भूखंड देण्यात आले आहेत. मात्र तरीही खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबांना जून महिन्यात दरमहा सहा हजार रुपये घरभाडे आणि ५४ हजार रूपये खावटी देण्यात येईल.