ठाणे : जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळूसह शाई धरण बांधण्याची गरज आहे. यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. मंत्रालयात यासाठी लवकरच जलसंपदामंत्र्यांकडे बैठक घेऊन हा विषय कायमचा मार्गी लावायचा आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शहरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पाणीटंचाई आढावा बैठकीत केले. तर, या काळू धरणासाठी ठाणे महापालिका स्वत: २५ टक्के खर्च करण्यास तयार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
येथील नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांसह ग्रामीण भागातील पाणीटंचाई कृती आढावा बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्याप्रसंगी ते बोलत होते. भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी काळू व शाई धरण बांधण्याची गरज असल्याचे यावेळच्या चर्चेस अनुसरून जयस्वाल यांनी हा विषय मांडून काळू धरणासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी यावेळी केले. काळू धरण बांधण्यासाठी कॅबिनेटमध्ये हा विषय जोरदारपणे चर्चेत घेतला असून ते बांधण्याचा निर्णयही घेतला आहे. या धरणाच्या जागेसाठी वनविभागाला ३२३ कोटी रुपये द्यायचे असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या काळू धरणाद्वारे सर्व महापालिकांच्या शहरांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
शहराला भातसा धरणातून मिळणाऱ्या पाण्यासह स्टेमकडून १०० एमएलडी, बारवीतून १०० एमएलडी पाणी ठाणे शहरास मिळत आहे. याशिवाय, पाण्याची गळती थांबवली आहे. यामुळे शहराला २० वर्षे पाणी पुरेल, याचे नियोजन करून घेतल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट करून काळू व शाई धरण बांधण्याची अत्यंत गरज असल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांनी ठाणे महापालिकेचा आदर्श घेऊन पाण्याच्या साठवणुकीचे नियोजन करण्याची तंबी पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. पाणी साठवण्याची क्षमता नसल्यामुळेच रस्त्यांवर पाणी वाहून जात आहे. यामुळेच नागरिकांना ते मिळत नसल्याचे वास्तव पालकमंत्र्यांनी महापालिकांच्या आयुक्तांच्या लक्षात आणून दिले.
काळू व शाईचे पाणी शेतीला नकोच - संजीव जयस्वालशहरांसाठी बांधण्यात येत असलेल्या या काळू व शाई या धरणांतील सर्वाधिक पाणी शहरांसाठी मिळायला हवे. या पाण्यातील जास्त पाणी शेतीला जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. शहरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या धरणांचे सर्वाधिक पाणी जिल्ह्यातील महापालिकांच्या शहरांनाच वापरता येईल, याची काळजी घेण्याचे जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केले.
ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन २० वर्षे पाणीपुरवठा सुरळीत होईल, याची काळजी घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी महापालिकेला मिळणाºया पाण्यापैकी ३८ टक्के पाण्याची साठवणूक करण्याची क्षमता निर्माण केल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले.सध्या सुरू असलेली ३० तासांची पाणीकपात ४० तासांवर जात असल्याचे जयस्वाल यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले. या टंचाईवर मात करण्यासाठी १८ टक्के पाणीसाठवण क्षमता निर्माण केल्यानंतर २५ टक्के आणि आता ३८ टक्के पाणीसाठवण क्षमता तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२७ गावांसह ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या कामात हलगर्जीया बैठकीत २७गावांच्या पाणीपुरवठ्यासह अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी येथील पाणीपुरवठ्याच्या संदर्भातही चर्चा झाली. एमजेपीकडून सुरू असलेल्या या पाणीपुरवठा योजनांच्या कामात हलगर्जी होत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांकडे त्यासंदर्भात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एमजेपीकडे असलेल्या योजनांच्या कामासाठी निविदा काढूनही ठेकेदार का मिळत नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. तर, एमजेपीच्या कामाबाबत आमदार कथोरे यांच्यासह आमदार गणपत गायकवाड यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. भिवंडीसह ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी या पाण्याच्या पाइपलाइनसाठी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत. पण, शहरांप्रमाणे त्यांच्या वाढीव पाण्यात अजूनही वाढ झालेली नाही. त्यांना मिळणाºया सहा एमएलडी पाण्यातून गळतीच जास्त होत आहे. यामुळे त्यांना कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यांच्यासाठी ११ एमएलडीपेक्षा जास्त वाढीव पाणी देण्याची गरज असल्याचे खासदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.