ठाणे : कॅडबरी कंपनीजवळ सिग्नल तोडून भरघाव जाणाऱ्या एका मोटार कारनेठाणे ते येऊरकडे जाणाऱ्या ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या अपघातात करशन बनगारी (४२) या कार चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.ठाणे ते येऊर जाणारी ही बस खोपट ते कॅडबरी कंपनीच्या दिशेने ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास सिग्नल सुटल्यामुळे कॅडबरी नाका येथून निघाली होती. त्याचवेळी मुंबई ते नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारकारने सिग्नल तोडून भरघाव वेगात जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या मोटारीची धडक टीएमटीला बसली. यामध्ये बनगारीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याचे स्कॅनिंगही केले असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. घटनास्थळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत मदतकार्य केले. या चालकाला कॅडबरी नाक्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, टीएमटीचे चालक विकास बटेती, वाहक हनुमंत विधाते तसेच २२ प्रवासी सुखरुप बचावले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अति घाई संकटात नेई! सिग्नल तोडून भरधाव जाणाऱ्या कारची TMT बसला धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 6:59 PM