कल्याण : अतिवृष्टीच्या काळात दुर्घटना टाळण्यासाठी केडीएमसी हद्दीतील अतिधोकादायक इमारती पाडण्याचे निर्देश नुकतेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार आणि विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील वसंत निवास ही अतिधोकादायक इमारत मंगळवारी पाडण्यास सुरुवात करण्यात आली.
१९६६ मध्ये बांधलेल्या वसंत निवास या तीन मजली इमारतीला मनपाकडून २०१७ पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्यातील व्यावसायिक गाळे रिकामे करून तसेच दोन रहिवाशांना रहिवासमुक्त करून इमारत पाडण्यात आली. ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांनी दोन जेसीबी, एक पोकलेन, दोन ब्रेकर व महापालिकेचे ३० कामगार यांच्या मदतीने ही कारवाई सुरू केली. तसेच इमारतीच्या पूर्ण निष्कासनाची कारवाई पाच दिवसात पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
‘जे’ प्रभागातील उल्हासनगर वालधुनी या रस्त्यावरील स्वागत गेटची लोखंडी कमान धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी उपअभियंता सुनील वैद्य तसेच ‘जे’ प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्या मदतीने काढून टाकली.
---------------