सदानंद नाईक
उल्हासनगर : मागील तीन महिने मृत्यूशी झुंज देणारा टायगर ठणठणीत होऊन मुंबईतील वाडिया रुग्णालयातून शुक्रवारी त्याला सोडण्यात आले. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार टायगरला नेरूळ येथील बालकाश्रमात ठेवण्यात येणार आहे. ही प्रक्रिया करताना रगडे दाम्पत्यासह पोलिसांचे डोळे पाणावले.
उल्हासनगरातील वडोलगावच्या नाल्यातून ३० डिसेंबरला दुपारी २ च्या दरम्यान प्लास्टिक पिशवीतून रडण्याचा आवाज आल्यावर, जमलेल्या महिलांनी समाजसेवक शिवाजी रगडे दाम्पत्याला याची माहिती दिली. रगडे दाम्पत्याने मध्यवर्ती पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही तासांपूर्वी जन्मलेल्या मुलाला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नाल्यातील सांडपाण्यामुळे मुलाला संसर्ग झाल्याने त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. रगडे दाम्पत्याने मुलाचे नाव टायगर ठेवून त्याच्या उपचाराची माहिती समाजमाध्यमावर टाकल्याने टायगर नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनला. उपचारादरम्यान रक्तात संसर्ग झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचाराचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यावर रगडे यांनी न्यायालयाचा आदेश आणून स्वखर्चाने टायगरला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरतीकेले.
खाजगी रुग्णालयात रक्तातील संसर्ग बरा होत नसल्याने, त्यांनी मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला.रगडे दाम्पत्याने टायगरचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिल्यावर वाडिया रुग्णालयात दाखल केले. रक्ताचा संसर्ग बरा होत नाही, तोच डोक्यात पाणी साचल्याचे उघड झाले. शस्त्रक्रियेसाठी खर्च मोठा येत असल्याने रुग्णालयाने समाजसेवी संस्थेतर्फे मदतीचे आवाहन केले. २४ तासांत १० लाख रुपये वाडिया रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा झाल्यावर टायगरवर उपचार सुरू करण्यात आले. तीन महिने मृत्यूशी झुंज देणारा टायगर मागील आठवड्यात ठणठणीत झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले. मात्र, पुन्हा एक आठवडा तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्याची विनंती करण्यात आली. टायगरच्या संरक्षणासाठी मध्यवर्ती पोलिसांनी २४ तास महिला पोलिसांचा पहारा ठेवला होता.शुक्रवारी टायगरला रुग्णालयातून सोडल्यावर रगडे दाम्पत्याने डॉक्टरांचे आभार मानले. टायगरला पोलीस संरक्षणात उल्हासनगरातील बालकल्याण समितीच्या कार्यालयात आणले. समितीकडून कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असताना टायगरची अनेकांनी भेट घेतली. टायगरला नेरूळ येथील बालकिरण बालकाश्रमाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तेथून टायगरच्या दत्तक प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती रगडे यांनी दिली.
पालकमंत्र्यांकडून विचारपूसदरम्यान, वाडिया रुग्णालयात टायगरच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी निघालेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथेच टायगरची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. तसेच मदतीचे आश्वासन दिले.तीन अवघड शस्त्रक्रियातीन महिन्यांच्या टायगरवर तीन महिन्यांत तीन अवघड शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.