आरक्षण विरोधी काँग्रेसचा चेहरा समोर आला आहे : एकनाथ शिंदे
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 11, 2024 06:15 PM2024-09-11T18:15:02+5:302024-09-11T18:15:47+5:30
आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पोटात जे असत ते ओठात आलेले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्यावर केली.
ठाणे : प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशाची, देशातील जनतेची बदनामी करणे ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका कायम राहिलेली आहे. आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आला आहे. आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पोटात जे असत ते ओठात आलेले आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राहुल गांधी यांच्यावर केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना राहुल आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. शिंदे पुढे म्हणाले की, काँग्रेसने बाबासाहेबांना धोका दिला, त्यांना धोका देऊन पराभूत केले. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात. बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे. बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते विचार मांडत होते. मात्र, याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेल्या जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, एनडीए सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिम्मत जो करेल त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील. ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळला असेल.
लोकसभेमध्ये याच लोकांनी संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह पसरवले. बाबासाहेबांनी संविधानात दिलेले आरक्षण रद्द करणार असल्याचे आता लोकसभेच्या निकालानंतर हे लोक बोलत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी देशाची बदनामी करणे, आपला देश मागे आहे आणि इतर देशाचा उदो उदो करणार हे कुठले देश प्रेम? ही कुठली राष्ट्रभक्ती? याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्तीची बात करतात आणि दुसरीकडे देशाचा अपमान करणारा वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेला आहे म्हणून मी त्यांचा निषेध करतोय. संविधान विरोधी कोण हे यांच्या बोलण्यातून आज दिसलेला आहे . संविधानाला मानणारी जनता येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.