ठाणे: फेसबुक ग्रुप हे समाजात चांगल्या गोष्टी देखील रुजवत असतात. समाजमाध्यमांवर माणसे जोडली जातात आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होत असते. एक नेहमीच म्हटले जाते की, समाजमाध्यमांतून नकारात्मकता पसरवली जाते, वादविवाद होतात पण तसे नसून या माध्यमातून चांगले चित्र देखील समाजात निर्माण होऊ शकते असे एकमत वाचनवेडा फेसबुक ग्रुपचे संचालक विनम्र भाबळ, मुंबई स्वयंपाकघरच्या भक्ती चपळगावकर, सिनेमागल्लीचे गुरुदत्त सोनसुरकर यांनी मांडले.
फेसबुक ग्रुप काय करतात? या विषयावर मॅजेस्टिक गप्पांचे तिसरे पुष्प गुंफण्यात आले. भाबळ, चपळगावकर, सोनसुरकर या तिघांनी ही फेसबुक ग्रुप सुरू करण्याचा प्रवास, आलेल्या अडचणी, विनोदी किस्से प्रेक्षकांसमोर मांडले. निवेदक मकरंद जोशी यांनी त्यांना बोलते केले. भाबळ यांनी वाचनाने माणसी जोडली जातात पण फेसबुक ग्रुपमुळे माणसे तुटली देखील असल्याचे प्रांजळपणे सांगितले. वाईट प्रसिद्धी देखील कधी कधी चांगली प्रसिद्धी ठरते हे वाचनवेडा या ग्रुपबाबत झाले असल्याचा स्वानुभव सांगताना ते म्हणाले की, एखादी पोस्ट स्वीकारणे जितके सोपे तितके ती नाकारणे कठीण असते. वाचकांच्या प्रेमामुळे हा ग्रुप सुरू असल्याचे ते म्हणाले. समाजमाध्यमाच्या ग्रुपच्या ॲडमिनची भूमिका ही संपादकीय भूमिकेसारखी असते. ग्रुपवर काय गेले पाहिजे हे पाहावे लागते. वाचनवेडा या ग्रुपमुळे पुस्तकांकडे लोक वळू लागले.
चपळगावकर यांनी मुंबई स्वयंपाकघर ग्रुपच्या माध्यमातून विस्मृतीत गेलेले खाद्यपदार्थ, सकस आहाराच्या रेसीपी लोकांसमोर आल्या. यानिमित्ताने समविचारी लोक एकत्र येतात आणि समाजमाध्यमांचा विधायक उपयोग देखील होतो. फेसबुक हे व्यावसायिक व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, तुम्ही ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचा तुमचा फेसबुक ग्रुप असतो असेही त्या म्हणाल्या. सोनसुरकर यांनी सिनेमांवर लिहीणाऱ्यांसाठी सिनेमा गल्ली हा ग्रुप सुरू केला. हा ग्रुप लिहीणाऱ्यांवर जगत असल्याने यावर प्रमोशन फार मर्यादीत असते. प्रत्येक पोस्ट वाचूनच ती स्वीकारावी लागते. हॅशटॅगला लोक आधी कंटाळायचे पण ते देखील महत्त्वाचे असते हे आता लक्षात आले आहे. या ग्रुपमुळे लोक सभोवतालचा विचार करायला लागली असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रुपवर कधी कधी वाद होतात मग नेटकऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक काही पोस्ट देखील टाकाव्या लागतात असेही ते म्हणाले.