मीरारोड - फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही. मुद्दे नाहीत म्हणून आरोप करणारे , घरत बसणारे यांना लोकं साथ देत नाहीत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीरा भाईंदर मध्ये शनिवारी रात्री आले होते . भाईंदरच्या गोडदेव नाका पासून काशीमीरा पर्यंतच्या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
शनिवारी रात्री महायुतीचे उमेदवार म्हस्के यांच्या प्रचारफेरीत मुख्यमंत्री शिंदे हे भाईंदर पूर्वेच्या गोडदेव नाका येथून इंद्रलोक , मीरारोडच्या रामदेव पार्क , कनकिया , हटकेश ते नीलकमल नाका पर्यंत सहभागी झाले होते . म्हस्के यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , माजी आमदार रवींद्र फाटक , नरेंद्र मेहता , शिवसेना जिल्हा प्रमुख राजू भोईर , विक्रमप्रताप सिंह आदीसह भाजपा , शिंदेसेना , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट , आरपीआय चे पदाधिकारी - कार्यकर्ते , माजी नगरसेवक आदी उपस्थित होते .
ठाणे हा शिवसेनेचा गड असून यंदा नरेश म्हस्के हे प्रचंड मतांनी निवडणून येणार . मीरा भाईंदरचा विकास केला असून सिमेंट रस्त्यांची कामे सुरु आहेत . रुग्णालय , मेट्रो , क्लस्टर आदी अनेक कामे होत आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात १० वर्षात तर महायुतीने राज्यात २ वर्षात विकास कामे केली असून लोकं विकासाच्या मुद्द्यावर विकास करणाऱ्यांना मतदान करणार असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले .