ठाणे: आधी भरगच्च फेसबुक प्रोफाईल. नंतर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवून निखळ मैत्रिचे नाटक करायचे. नंतर अत्यंत मोठया गप्पा मारुन मोठी दिवास्वप्ने दाखवित महागडे अलंकार तसेच परकीय चलन मोठया प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा करणा-या एका भामटयाने भेट वस्तू पाठविल्याचे सांगून तिच्या अबकारी शुल्कापोटी एका महिलेची २२ लाख ३९ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठया पदावर नोकरी करणा-या ठाण्याच्या आनंद पार्क सोसायटीतील पूजा दळवी (३२) या महिलेशी जॅसान (रा. लंडन, यूके) याने फेसबुक या समाजमाध्यमाद्वारे मैत्री केली. सुरुवातीला दोघांनी एकमेकांची इमानेइतबारे विचारपूस केल्यानंतर त्याने तिचा विश्वास संपादन केला. २२ आॅक्टोबर २०१७ पासून त्यांच्या फेसबुकवरुन गप्पा सुरु होत्या. नंतर त्याने अचानक आपण एक मोठी हस्ती असल्याचे भासविले. आपल्याकडे सोन्याचे, हिºयांचे किंमती अलंकार असल्याचेही तिला भासविले. नंतर त्याने ‘तुझ्यासाठी एक चांगले दागिने आणि ब्रिटीश पौंडच्या स्वरुपामध्ये परकीय चलनही पाठवित असल्याचे तिला सांगितला. सुरुवातीला तिने या गिफ्टला नम्रपणे नकारही दिला. पण त्याने तिला पुन्हा गळ घातल्यावर तिने त्याला होकार दिला. तिचा होकार मिळताच दिल्ली येथील ‘डेल्टा कुरिअर डिलेव्हरी सर्व्हिस’ मधून तिला तात्काळ फोन आला. आपले गिफ्ट आले असून ते घेण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल. या कुरियर कंपनीने या गिफ्टसाठी सुरुवातीला तिला ४२ हजार ५०० इतकी रक्कम भरण्यास भाग पाडले. ही रक्कम मिळाल्यानंतर पार्सलचे वजन आणि इतर कारणास्तव पुन्हा तिच्याकडून २५ हजार, त्यानंतर एक लाख २८ हजार पुढे दीड लाख अशा रकमा घेतल्या. आता तरी आपले गिफ्ट मिळेल, या भाभडया आशेवर असलेल्या दळवी यांना पुन्हा जीएसटी तसेच इतर करांच्या नावाखाली कुरियर कंपनीने पैसे घेणे सुरुच ठेवले. ११ डिसेंबर पर्यंत तिच्याकडून हा कथित मित्र आणि या कुरियर कंपनीने २२ लाख ३९ हजारांची रक्कम घेतली. आपल्याला गिफ्टच्या नावाखाली पूर्णपणे फसविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अखेर ११ डिसेंबर रोजी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे......................प्रलोभनांना बळी पडू नकाकोणीही तुम्हाला गिफ्ट पाठवितो, म्हणून अमूक एक रक्कम बँकेत भरा किंवा अबकारी डयूटी भरावी लागेल, अशी बतावणी करीत असेल तर वेळीच सावध व्हा. तसेच लग्नाचेही अमिष दाखवित अशा लुटमारीच्या अनेक घटना दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन राबोडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी नागरिकांना केले आहे.