ठाणे : संचारबंदीच्या काळात नागरिकांनी किराणा, भाजीपाला आणि औषध खरेदीसाठी घराबाहेर पडू नये यासाठी शहरातील विक्रेत्यांकडून जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी डिजी ठाणे प्रणालीवर http://essentials.thanecity.gov.in/ या वेबसाईटवरून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने जाहिर केलेल्या संचारबंदी कालावधीत ठाणे शहरात प्रमुख ठिकाणी नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी विक्रेत्यांच्यावतीने करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे बनवलेल्या वेबसाईटला भेट देऊन दिलेल्या यादीतील दुकानदारांकडे फोनवरून संपर्कसाधून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूची मागणी करावी. कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी लॉकडाऊन कालावधीत नागरीकांची घरबसल्या जीवनावश्यक वस्तूंची गरज लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून हे विशेष संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, त्यास संबंधित व्यवसायिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. महापालिकेच्यावतीने ११४५ दुकानदारांची यादी त्यांच्या मोबाईल नंबरसह प्रसिद्ध केली आहे. यावेळी गरज पडल्यास या कामात महानगरपालिकेचे अधिकारी समन्वयकाची भूमिका पार पाडतील अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. ग्राहकांनी दूरध्वनीवरून त्यांच्याकडे आपल्याला आवश्यक असलेली वस्तूंची मागणी नोंदविल्यानंतर विक्रेता संबंधित ग्राहकास त्याच्या वस्तू योग्य दरांमध्ये घरपोच करेल. घरपोच डिलीव्हरी केलेल्या कर्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा संपर्कहोणार नाही याचीही दक्षता विक्रेत्यांच्यावतीने घेण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी घरपोच डिलीव्हरी केलेले पदार्थ हाताळण्याबाबत योग्य दक्षता घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
महापालिकेच्या डीजी प्रणालीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तु घरपोच देण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 2:39 PM