लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा बोजवारा उडल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या तक्रारींची दखल आमदार रईस शेख यांनी घेत रुग्णालयाची दुरुस्ती व इतर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांची गुरुवारी भेट घेतली. येत्या काही दिवसांमध्येच रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतील, असे आश्वासन प्रधान सचिवांनी शेख यांना दिले.
गांधी स्मृती रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यता मिळूनही अनेक वर्षे येथे सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पाठपुरावा करूनही समस्यांचे निराकरण होत नसल्याने शेख यांच्या मागणीनुसार राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. बैठकीमध्ये रुग्णालयात डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड कोर्सेस सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. याद्वारे रुग्णालयामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील.
स्त्रीराेगतज्ज्ञांची नियुक्ती न झाल्यास कारवाईn मागील तीन महिन्यांपासून स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ नसल्याने महिला व बालकांचे खूपच हाल होत आहेत. त्यामुळे तीन स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. nनियुक्ती न झाल्यास उपसंचालिका व शल्य चिकित्सक यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट आणि मंजूर असलेली रिक्त पदेही भरण्याचे आदेश बैठकीत दिले.