मीरारोड - मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकाची उन्नत अर्थात डेक लेव्हल वर विस्तारीकरणा सह विविध सुविधा कामांची पाहणी करून त्याचा आढावा खासदार राजन विचारे यांनी घेतला. दोन्ही रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुविधांसाठी अनेक कामे पूर्ण झाली असून सुरु असलेली कामे लवकर पूर्ण होतील असे यावेळी विचारे म्हणाले.
मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा चालवला आहे. एमआरव्हीसी ने एमयूटीपी ३ ए च्या प्रकल्पामध्ये १९ रेल्वे स्थानकांचा विकास प्रकल्प अहवाल बनवला होता व मार्च २०१९ ला रेल्वे बोर्डाकडून रेल्वे स्थानकासाठी ६० कोटी व भाईंदर रेल्वे स्थानकासाठी ५० कोटी खर्चाची मंजुरी मिळाली होती.
विचारे यांनी माहिती देताना सांगितले कि, मीरारोड रेल्वे स्थानकात ५ सरकते जिने, ३ लिफ्ट, ८ जिने तसेच फलाट १ वर २७० बाय १०.७० मीटरचा उन्नत डेक, स्टेशन बिल्डींगसह उत्तरेस पादचारी पूल व त्याला जोडणारे १ सरकता जिना आणि ४ जिने ही कामे होत आहेत. फलाट क्र. १ ची लांबी व रुंदी ६.५ ते ११ मीटर पर्यंत वाढवली जाणार आहे. मध्यभागात रुंद पादचारी पूल व त्याला ३ लिफ्ट, ३ सरकते जिने व ३ पायऱ्यांचे जिने असतील. भविष्यात फलाट क्र. ६ ची लांबी वाढवली जाणार आहे. तेथे स्वच्छतागृह , रेल्वे पोलिस व टीसी कक्ष व पादचारी पुलावर ७ खिडकी असलेले तिकीट कार्यालय, स्टेशन मास्तर व कर्मचाऱ्यांसाठी कक्ष अशी व्यवस्था असणार आहे.
भाईंदर रेल्वे स्थानकात ३ सरकते जिने, ३ लिफ्ट व २ पायऱ्याचे जिने असतील . फलाट क्र. ६ वर सर्व पादचारी पुलांना जोडणारा ३०० बाय २२ मीटरचा उन्नत डेक होईल. फलाट क्र. ६ ची लांबी व रुंदी वाढवली जाणार आहे. त्याला २ जिन्यांची रुंदी वाढवून जोडण्यात येणार आहे. डेक खाली बेसमेंट ला पार्किंग क्षेत्र विकसित करून डेक वर तिकीट खिडकी व आरक्षण तिकीट खिडकी होणार आहे. येथे देखील स्टेशन मास्टर , रेल्वे पोलिस, टीसी व कर्मचारी कक्ष असणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मीरारोड रेल्वे स्थानकात आणखी २ फलाट तर भाईंदर स्थानकात १ फलाट वाढणार आहे. भविष्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांना रेल्वे स्थानकात थांबा मिळेल याचे प्रयत्न सुरु आहेत असे विचारे म्हणाले.
मीरारोड रेल्वे स्थानकातील कामे मार्च २०२५ मध्ये पूर्ण होतील. भाईंदर रेल्वे स्थानकात फेब्रुवारी २०२४ मध्ये काम सुरु होऊन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होतील अशी शक्यता एमआरव्हीसीचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर विलास वाडेकर यांनी बुधवारी मीरारोड स्थानकातील कामांच्या पाहणी दौऱ्यावेळी व्यक्त केली. यावेळी मध्य रेल्वेचे एडीआरएम मधुसदन सिंग, डीसीएम अरुण मीना, इंजिनीयर राजकुमार शर्मा तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सह शिवसेनेच्या माजी नगरसेविका तारा घरत, युवासेनेचे पवन घरत, तेजस्विनी पाटील, लक्ष्मण जंगम, स्नेहल सावंत, चंद्रकांत मुद्रस, लक्ष्मण कांदळगावकर, विनायक नलावडे, अस्तिक म्हात्रे, वीरेंद्र म्हात्रे, तरुण जैन संदेश रहाटे आदी उपस्थित होते.