ठाणे : सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील विहिगाव दत्तक घेतले आहे. केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंग या गावास शनिवारी भेट देणार होते. अखेर, त्यांच्या अनुपस्थितीत विहिगावच्या सोयीसुविधांचा लोकार्पण सोहळा सहस्रबुद्धे यांच्यासह खासदार कपिल पाटील, ग्रामविकास समाजसेवक पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पार पडला.
लोकार्पण सोहळ्यापूर्वी २० दिवस आधी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. तेव्हा केंद्रीय ग्रामविकासमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचे लोकार्पण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. यामुळे या गावातील विकासकामांच्या समारोप व सोयीसुविधांचे लोकार्पण शनिवारी उभय मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहापूरच्या विहिगाव या दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या या नॉट रिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. यामुळे ते गाव जगाच्या संपर्कात आले. कृषीच्या आत्मा योजनेद्वारे ५० एकर शेतीमध्ये सेंद्रिय तांदूळ उत्पादन घेण्यात आले. अशा ६८ विकासकामांच्या आराखड्यांद्वारे या गावाचा विकास सहस्रबुद्धे यांनी साधला.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाद्वारे अवजारे बँकेने दोन महिला बचत गटांना पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टर, कापणीयंत्राचे वितरण केले. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमही झाला. महिला बचत गट मेळाव्यांसह विविध कार्यक्रम पार पडले.सेंद्रिय शेतीचे रिपोर्टकार्ड शेतकऱ्यांना प्रदानच्पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांची जयंती योगायोगाने शेतकरी दिन म्हणून शनिवारी साजरी झाली. यावेळी येथे उत्पादित सेंद्रिय तांदूळ सॅम्पलचे वाटप झाले. लॅबद्वारे तयार केलेले सेंद्रिय शेतीचे रिपोर्टकार्ड शेतकºयांना दिले. या शेतीमधून २०२२ पर्यंत दर्जेदार उत्पादन घेता येईल. त्याविषयी पत्रिका यावेळी दिल्याचे आत्मा प्रकल्प संचालक पी. एम. चांदवडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.