अंबरनाथ : नगरपालिका स्वच्छ भारत अभियानातंर्गत लाखो रूपये खर्च करून शहरात विविध उपक्र म राबवत आहे. नगरपालिका भिंती रंगवून स्वच्छतेसाठी संदेश देत असताना दुसरीकडे काही फेरीवाले आणि रिक्षाचालक लघुशंका करून रंगवलेल्या भिंती खराब करत आहेत.यावर्षीही नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत भाग घेत शहरात विविध उपक्र म राबवण्यास सुरूवात केली आहे. शहरातील महात्मा गांधी विद्यालय,उड्डाणपूल तसेच शहरातील काही भिंतीवर स्वच्छ भारत अंतर्गत भिंतीवर थुंकू नये, शहर स्वच्छ ठेवा,उघड्यावर थुंकू नये असे अनेक प्रकारचे संदेश देत भिंती रंगवल्या आहेत.प्लास्टिकचा वापर टाळा, स्वच्छ अंबरनाथ, सुंदर अंबरनाथ, हरित अंबरनाथ असे विविध संदेश लिहून भिंतींना आकर्षक रंगरंगोटी केली आहे. या कामासाठी अंबरनाथ नगरपालिकेने यंदा २५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.त्यामुळे नगरपालिका एकीकडे लाखोंचा निधी खर्च करत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती करतआहे.मात्र दुसरीकडे शहरातील स्टेशन परिसरातीलच रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांकडून याच स्वच्छता, जनजागृतीचे संदेश लिहीलेल्या भिंतीवर लघुशंका केली जाते. या प्रकाराने सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे.पालिकेचे होतेय दुर्लक्षअंबरनाथ नगरपालिकेच्या समोर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या भिंतीला लागूनच रिक्षातळ आहे. याच भिंतीवर स्वच्छतेचे संदेश लिहीले आहेत. मात्र या रिक्षातळावरील चालक स्वच्छतेचे संदेश लिहिलेल्या भिंतीवर लघुशंका करत असतात. हीच परिस्थिती शहरातील इतर भागातही असून अनेक रिक्षाचालक, फेरीवाल्यांकडून नगरपालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्यात येत आहे. मात्र याबाबत नगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याचे समोर येत आहे.
पालिकेच्या स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या भिंतीवरच लघुशंका, अंबरनाथमधील वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 3:19 AM