ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी, कन्हैय्या कुमार यांनी आवर्जुन उपस्थिती दर्शवली. शरद पवार आणि कन्हैय्या यांच्यातही यावेळी चर्चा झाली. आव्हाड यांच्या अर्ज भरतेवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कन्हैय्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री नसून मॉडेल आहेत, अशी टीपण्णी त्यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मॉडेल स्वरुपातील फडणवीस यांचे जुने फोटो व्हायरल झाले होते.
आजचे राजकीय वातावरण योग्य नाही, केंद्रीय संस्थांचा वापर पक्षाच्या हितासाठी केला जातोय. जो भ्रष्ट आहे तो भाजपात गेली की सदाचारी कसा काय होतो. जेव्हा शेतकरी आत्महत्या दुष्काळ याबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले असता, ते फोटोशूट करण्यात व्यस्त होते. असं वाटत होतं, जणू महाराष्ट्राने मुख्यमंत्री निवडला नसून मॉडेल निवडला आहे, असे म्हणत मार्क्सवादी पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. भाजपाला याबाबत प्रश्न विचारले असता, त्यांचे नेते उत्तर देतात की, मग दुसरा चेहरा कोण? विरोधकांकडे कुणी दुसरा चेहरा आहे का?. मुख्यमंत्री स्वत:ला स्मार्ट दाखविण्याचा प्रयत्न करतात, असे म्हणत कन्हैय्या यांनी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्यांवर टीका केली. तसेच, महाराष्ट्रात जे लढण्याचे स्पिरीट आहे, ते संपवले जात असल्याचा आरोपही कन्हैय्या यांनी केला. महाराष्ट्रात विधानसभेत सेक्युलरचा आवाज फक्त जितेंद्र आव्हाड हेच आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी ठाण्यात आलोय, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचं कौतुक कन्हैय्या यांनी केलयं.
देश वाचवायचा असेल तर पुरोगामी विचार आत्मसात करावे लागतील. जगाने काल गांधी जयंती साजरी केली. पण, ट्विटरवर गोडसे अमर रहे ट्रोल होतय, याची लाज वाटली पाहिजे. निवडणूकीच्या वेळेस जाती अन् भाषेचं इमोशनल कार्ड चालवले जाते. मात्र, कांदा लोकांना रडवतोय त्यामुळे लोकांनी लक्षात ठेवावे. पंतप्रधान निवडणुकांच्या आधी अच्छे दिन बोलायचे आज बोलतायेत का? कारण त्यांना माहितीये मार्केटिंग कशी करायची, असे म्हणत कन्हैय्या यांनी नरेंद्र मोदींवरही टीका केली.