उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेत पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यावर चौफेर टीका केली. फडणवीस हे महाराष्ट्राचे नव्हेतर गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्यानेच राज्यातील उधोग गुजरातला जात असल्याची टीका अंधारी यांनी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील दसरा मैदानात शिवसेना ठाकरे गटा तर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन सोमवारी सायंकाळी केले होते. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप, पदाधिकारी अल्ताफ शेख, कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उपजिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, सुभाष जाधव, राष्ट्रवादीचे सदा पाटील, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, दिलीप मालवणकर आदीजन यावेळी उपस्थित होते. सुषमा अंधारे यांनी महायुतीच्या सरकारवर चौफेर टीका करून यांनी महाराष्ट्राच्या अस्तित्वाला हात घालण्याचा महापाप केले असून ५ ते ६ महिन्यात निवडणुकीचे संकेत अंधारे यांनी दिले. तसेच स्थानिक शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचा बालु असे नाव घेत शिवसैनिक नसलेल्याला शिवसेना पदाधिकार्यांनी जीवाचे रान करून तीन वेळा निवडून दिल्याचे सांगितले. मात्र बालु याचे पुढे काय होणार? असा प्रश्नचिन्हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर केला.
महाराष्ट्राच्या अस्तित्वावर घाला घालणाऱ्या फडणवीस व शिंदे सरकार यांची विश्वासार्हता गेली असून खरे मुख्यमंत्री फडणवीस आहेत. तर शिंदे भाजपचे प्यादे बनल्याचे अंधारे यांनी सांगितले. भाषण दरम्यान शिवसैनिक ५० खोके एकदम ओके, गद्दार आदी घोषणाबाजी होत होती. महाराष्ट्र मधील परिस्थितीत पाहता देवेंद्र फडणवीस गुजरातचे मुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे प्रभारी मंत्री असल्याने राज्यातील अनेक उधोग गुजरातला जात असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली.
सरकार मधील मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांच्यासह पक्षाचे रामदास कदम यांच्या बेताल वक्तव्यावर गुन्हा न होता. माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गर्दीत महिलेला बाजूला केले म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो. फडणवीस राज्याचे नव्हेतर भाजपचे गृहमंत्री सारखे वागत आहेत. त्यांनी धुतराष्टाची भूमिका वठवू नये. असेही सुनावले. तसेच लवकरच बाजी पलटणार असल्याचे संकेत अंधारे यांनी दिल्यावर शिवसैनिकांनी शिंदे गटा विरोधात घोषणाबाजी केली.