पालघर : पालघर नगरपालिकेतून २२ कोटींच्या विकासकामांची निविदा नियमाचे उल्लंघन करून काढण्यात आल्याची तक्रार गटनेते तसेच जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांनी केल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्याचा शिवसेना संपर्कप्रमुख व सहसंपर्कप्रमुखांचा डाव यशस्वीरीत्या परतावून लावण्यात पिंपळे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पालघर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर सेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत सेनेच्या बालेकिल्ल्याचे बुरूज आता ढासळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पालघर नगरपालिकेने सात प्रभागांत रस्ते, स्मशानभूमी, रस्ते, रुंदीकरण व मजबुतीकरण इ. २२ कोटींची निविदा काढताना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियमांसह प्रशासकीय तांत्रिक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत निविदा प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी गटनेते उत्तम पिंपळे यांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामुळे आर्थिक टक्केवारीच्या गर्तेत अडकलेल्या या निविदेमधून मिळणाऱ्या लाभाला आपल्याला मुकावे लागेल, या शक्यतेने बैचेन झालेल्या अनेकांनी गटनेते व जिल्हाप्रमुखांविरोधात उघड आघाडी उघडून मोर्चेबांधणी केली होती. संपर्कप्रमुख अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये गटनेते म्हणून पिंपळे यांनी केलेली तक्रार योग्य नसल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यांच्याकडून नगरपालिकेचे गटनेतेपद काढून घेण्यात यावे, अशी चर्चा बैठकीत रंगून नगरसेवक अतुल पाठक यांचे नाव पुढे आले. परंतु, मध्येच माजी नगराध्यक्षा अंजली पाटील यांचेही नाव पुढे येऊन त्यासाठी काही नगरसेवकांना अंधारात ठेवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याने पिंपळेच्या विरोधातील उभ्या राहिलेल्या गटामध्येच दुफळी निर्माण होऊन हा गट बिथरला. (वार्ताहर)
सेना जिल्हाप्रमुखांना हटविण्याचा डाव फसला
By admin | Published: October 28, 2015 12:42 AM