ठाणे - दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना जशी फेरपरीक्षा देता येते. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील इयत्ता ९ वीमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही आता फेरपरीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा शाळा सुरू झाल्यावर जूनच्या शेवटच्या आठवड्यात घ्यावी, असे आदेश ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) शेषराव बडे यांनी पत्रकाद्वारे सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्यामुळे गतवर्षाप्रमाणे यंदाही ९ वीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये सर्व (माध्यमिक ) शाळांमध्ये इयत्ता ९ मधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षणाच्या पद्धती अंमलात आणल्यावरदेखील जर काही विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील तर अशा विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जावी, २०१८-१९ या वर्षाकरिता ही पुर्नपरीक्षा जून २०१९ मध्ये घ्यावी, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच ती शाळा सुरू झाल्यानंतर साधारणत: जूनच्या शेवटच्या आठवड्यात घ्यावी, केवळ अनुत्तीर्ण झालेल्या विषयांची पुर्नपरीक्षा घ्यावी. याकरिता मूल्यमापन पद्धती इयत्ती ९ वी करीता असलेल्या सरासरी पद्धतीप्रमाणे राहील.मानसिकदृष्टया दिव्यांग असलेल्या ८० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना ९ वीतील मूलभूत संबोधावर आधारित प्रश्नपत्रिका आवश्यकता भासल्यास तयार करावी, गंभीर आजाराने पीडित विद्यार्थ्यांला मानसिकदृष्ट्या दिव्यांगासाठी तयार केलेल्या मुलभूत संबोध प्रश्नावलीची सवलत मिळावी, त्याचबरोबर परीक्षा घेतल्यानंतर त्याचा अहवाल जुलै २०१९ च्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याबाबत नमूद केले असल्याचे बडे यांनी म्हटले आहे.
अनुत्तीर्ण झालेल्या नववीच्या विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा, ठाणे जि.प.चे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 1:25 AM