कल्याण - कल्याण-डोंबिवलीत सोमवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि सखल भागांमध्ये पाणी साचले. या परिस्थितीशी सामना करण्यात सरकारी यंत्रणा अपुऱ्या पडल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, साचलेल्या पाण्यातच दिवसरात्र काढण्याची वेळ नागरिकांवर आली. पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती.कल्याण-डोंबिवली परिसरात मागील दिवसभरात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत एकूण एक हजार ३२४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाची एकूण नोंद पाहता मागील वर्षीच्या तुलनेत २७० मिलिमीटर पावसाची नोंद अधिक झाली आहे.सोमवारी पहाटेपासून पडणाºया पावसामुळे कल्याणच्या शिवाजी चौकात, महंमद अली चौकात, चिकणघर, साईनाथ कॉलनी, रामदासवाडी, गणेश मंदिर, ओम साई, शुभम व चंद्रगिरी सोसायटी आदी परिसर जलमय झाला. पूर्वेतील कल्याण-मलंग रोड, नांदिवली, आडिवली, ढोकळी आणि पिसवली परिसरातील घराघरांमध्ये पाणी शिरले.पिसवलीतील रहिवासी मनोज तिवारी म्हणाले, तीन दिवसांपासून घरात पाणी शिरले आहे. ते ओसरलेले नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतलेली नाही.डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानकाबाहेरील डॉ. राथ रोड, पाटकर रस्ता, नेहरू रोड, नांदिवली मठ परिसर, लोढा हेवन येथील सखल भागात, भोपर येथे काही ठिकाणी पाणी साचले होते. एमआयडीसीतील निवासी परिसरात सुदर्शनगर आणि मिलापनगर परिसरातील साचलेल्या पाण्याची स्थिती जैसे थे होती. साईबाबा मंदिर, ग्रीन्स स्कूल, अभिनव शाळा, कावेरी चौकातील पाण्याचा निचरा झालेला नव्हता. तर, पश्चिमेतील महात्मा फुले रस्ताही पाण्याखाली गेला होता.डोंबिवलीतील अनेक कारखान्यांमध्ये पावसाचे पाणी शिरून तळे झाले होते. फेज-२ मधील मेट्रोपोलिटन एक्झाकेम कंपनीत तीन फूट पाणी होते. त्यामुळे कामगार कामावर आले नाहीत. गेल्या तीन दिवसांपासून औद्योगिक परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कंपनीमालकांना नुकसान सोसावे लागत आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे पदाधिकारी देवेन सोनी यांनी दिली.पंचायत समितीत प्लास्टर कोसळलेकल्याण पंचायत समितीच्या छताचे प्लास्टर पावसामुळे कोसळले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. यापूर्वीही प्लास्टर पडल्याची घटना झाली होती. ही इमारत धोकादायक असल्याने तिच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीने पाठवला आहे. मात्र, अद्याप दुरुस्तीला मुहूर्त मिळालेला नाही. हे कार्यालय गोवेली येथे हलवण्याचे प्रस्तावित असल्याने नवी इमारत बांधणे अथवा स्थलांतर करण्याबाबत निर्णय झालेला नाही. परिणामी, कर्मचारी व अधिकारी धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून काम करतात.आपत्कालीनचाप्रतिसाद शून्यमहापालिकेच्या आपत्कालीन पथकाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. या कक्षात २४ तास कर्मचारी तैनात असतात, असा दावा महापालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे कर्मचारी आलेच नाहीत, अशी ओरड घरात पाणी शिरलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.ठाणे, मुंबई परिसरातही अशीच परिस्थिती-आयुक्तमहापालिका हद्दीत नालेसफाई योग्य प्रकारे झालेली नसल्याचा आरोप नागरिक आणि राजकीय मंडळींकडून होत आहे. त्यावर, आयुक्त गोविंद बोडके म्हणाले, जलमय परिस्थिती व पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता केवळ कल्याण-डोंबिवलीच जलमय झाली नाही, तर ठाणे, मुंबई महापालिका परिसरातही हीच स्थिती आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत नालेसफाई झाली नाही, या आरोपात तथ्य नाही.महापौर, उपमहापौरांकडून पाहणीकोळसेवाडी : मलंगपट्टी भागात झालेल्या मुसळधार पावसाने पेट्रोलपंपासमोरील बहुतांश चाळींमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे अतोनात नुकसान झाले. नागरिकांच्या तक्र ारीवरून महापौर विनीता राणे, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक मोरेश्वर भोईर आदींनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. अतिक्रमण आणि महापालिकेच्या हलगर्जीमुळे पाण्याचा निचरा न झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. त्यावर गटारांऐवजी नाले बांधण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाºयांना दिल्या.कल्याण पूर्वेतील आमराई परिसर, सह्याद्री, जीवनछाया, शिवनेरी, शामानंता, मानव कॉलनी आदी भागांतील चाळींमध्ये नुकतेच गुघडाभर पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांना ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात जाऊन जाब विचारला. रविवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी या भागाची पाहणी केली. गटारातील पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यानंतर, तेथे कार्यवाही करण्यात आली. मात्र, कायमस्वरूपी नाला बांधण्याची गरज असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
पाण्याचा निचरा करण्यात अपयश, कल्याण-डोंबिवलीतील सखल भाग, चाळींमधील नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 3:53 AM