लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शहरातील रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत कारवाई करण्याचा चंग बांधला होता. मात्र, ही कारवाई थंडावली आहे. त्यामुळे तेथे फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान मांडले आहे. सोमवारचा आठवडा बाजारही भरल्याने नागरिकांना पदपथावरून चालणेही कठीण झाले.पूर्वेला रेल्वे स्थानक परिसराला लागून असलेल्या राथ रोड व पाटकर रोडवर फेरीवाल्यांनी जागा व्यापत बस्तान मांडले. चौथा शनिवार, रविवार व त्यालाच जोडून आलेल्या बकरी ईदची सुट्टी यामुळे केडीएमसी तीन दिवस बंद होती. नेमकी हीच संधी साधत फेरिवाल्यांनी तातडीने ठाण मांडत बाजार सुरू केला. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी मागील दोन सोमवारी फेरिवाल्यांविरोधात साखळी उपोषण केले होते. त्याची दखल घेत ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी पूर्वेकडील स्थानक परिसरात सायंकाळी ६ ते ८.३० दरम्यान गर्दीच्या वेळेत कारवाईचा पवित्रा घेतला होता. परंतु, आठ दिवसांत कारवाईचा बार फुसका ठरल्याचे पाहायला मिळाले. दिवसभर कारवाई करणे शक्य नसल्याने सायंकाळी अडीच तास रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त ठेवला जाईल, असे कुमावत यांनी जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात मात्र कारवाई थंडावली आहे. त्यामुळे फेरीवाले ‘जैसे थे’ असल्याचे निदर्शनास आले.
फेरीवाल्यांविरोधातील कारवाईचा बार ठरला फुसका
By admin | Published: June 27, 2017 3:05 AM