वसंत पानसरे
किन्हवली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे राहणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या दाखल्यात जन्मतारखेची नोंद चुकीची झाल्याने तिचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पंचायत समिती ते मुंबई विद्यापीठापर्यंत पत्रव्यवहार करूनही किन्हवली महाविद्यालय जन्मतारखेत बदल करत नसल्याने या विद्यार्थिनीने उपोषणाचा इशारा दिला आहे.
किन्हवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील प्रज्ञा सुरेश वाढविंदे या विद्यार्थिनीने ६ जून २००५ रोजी किन्हवली येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत पहिलीसाठी प्रवेश घेतला. चौथी उत्तीर्ण झाल्यावर पुढील विद्यालयात प्रवेशासाठी ३० एप्रिल २०१० रोजी शाळा सोडताना मागितलेल्या जन्मदाखल्यावर ३१ सप्टेंबर १९९९ अशी चुकीची जन्मतारीख लिहिली गेली. मुळात सप्टेंबर महिना ३० दिवसांचाअसतो. परंतु, तत्कालीन मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे या विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. जन्मतारीख चुकीची असल्यामुळे तिला महाविद्यालयात प्रोव्हिजन प्रवेश मिळाला आहे. बीएमएसच्या पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊनही तिला तिचा निकाल मिळालेला नाही. दुसºया वर्षाकरिता २०१९-२० साठी प्रवेश अजूनही निश्चित नाही. या विद्यार्थिनीने १०० रु पयांच्या स्टॅम्पपेपरवरसत्यप्रतिज्ञा लेखाद्वारे जन्मतारीख बदलण्याची मागणी केली. परंतु, ती महाविद्यालयाने धुडकावली. शहापूर तालुका भारिप बहुजनमहासंघाचे प्रवक्ते रवींद्र जाधव यांनी हे प्रकरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे मांडल्यावर त्यांनी महाविद्यालयात संपर्क साधत नावनोंदणी, जन्मतारखेत बदल करण्यासाठी महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करावा व विद्यापीठ देईल, त्या निर्देशानुसार कार्यवाही करावी, असे सांगितले. महाविद्यालयाने केलेल्या पत्रव्यवहाराचे मुंबई विद्यापीठाने अवलोकन करून २८ जानेवारी २०१९ रोजी प्राचार्यांना दिलेल्या पत्रात शाळेने दिलेल्या जन्मतारखेत दुरुस्ती करावी, असा अभिप्राय दिला आहे.
तरीही, महाविद्यालय जन्मतारखेत बदल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विद्यार्थिनी प्रज्ञा, तिची आई सीमा, जाधव हे सोमवारी महाविद्यालयासमोर उपोषणास बसणार आहे