डोंबिवली- फेरीवाल्यांवर गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या कारवाईच्या विरोधात डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांनी मेळावा घेतला. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक सवाल फेरीवाल्यांनी उपस्थि केले आहेत. आम्ही व्यवसाय नाही केला तर काय भिका मागायच्या का? आमच्या मुला-बाळांची पोटं कशी भरणार? महापालिका आमचं पुनर्वसन कधी करणार?, असा सवाल फेरीवाल्यांनी उपस्थित केला आहे. डोंबिवली परिसरातील शेकडो फेरीवाल्यांनी मेळाव्याला हजेरी लावली आहे.
महापालिका अधिकारी संजय कुमावत गेल्या 12 वर्षांपासून एकाच ठिकाणी. फेरीवाल्यांकडून जप्त केलेला माल मोठ्या मॉल्सला विकतात. त्यातून त्यांनी दिवाळीत लाखो रुपये त्यांनी कमवले. फेरीवालाविरोधी पथकातील कर्मचारी ते आयुक्तांपर्यंत सर्वाना हफ्ता पाहीजे आहे.आजपर्यंत त्यांनी आपल्याकडून हफ्ते घेतले आणि तरीही आज आपल्यावर कारवाई करीत आहेत, असा आरोप शिवगर्जना भाजीविक्रेते मंडळाच्या भाऊ पाटील यांनी केला आहे.
आपल्या जीवावर हा वळू (राज्यकर्ते) माजला आहे. त्याला वेसण घालावे लागेल. आपल्याकडून खाऊन आपणच पोसून हा वळू माजला आहे. त्याला वेसण घातल्याशिवाय तो आपलं ऐकणार नाही. आज राज्य शायनिंग इंडियावाल्यांचे राज्य आहे .त्यांच्या स्मार्ट सिटीमध्ये आपल्यासारख्या लोकांना स्थान नाही.आपल्या पगारावर माजलेला वळू पालिका कमिश्नर आपल्यावरच कारवाई करतोय.ही हिटलरशाही नाही का?, असं कष्टकरी हॉकर्स आणि भाजीविक्रेते युनियनचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी म्हंटलं.
राजाजी पथ रोडवर हळबे आणि गणेश मंदिर संस्थानाचे प्रवीण दुधे यांनी हप्ते घेतले त्याची चौकशी राज ठाकरे करणार का? असा सवाल सरखोत यांनी केला. आम्ही न्यायालयात धाव घेणार असून अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची दाद मागणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं.