ठाणे : बनावट सीडीसी (निरंतर निर्वहन प्रमाणपत्र) विकणा-या टोळीचे आंध्र प्रदेश आणि ओडिशातही जाळे पसरले असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.नौसैनिक आणि अन्य काही पदांसाठी अनिवार्य असलेले सीडीसी बनावट तयार करून उमेदवारांना त्याची ५० हजार ते लाख रुपयांत विक्री करणाºया टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तीन आठवड्यांपूर्वी पर्दाफाश केला होता. या प्रकरणी डोंबिवलीतील कोळेगाव येथील अब्दुल्ला मनत्तुमपाडत हकीम, ठाण्यातील वागळे इस्टेटमधील विजयन गोपाल पिल्ले, मालाडमधील मालवण येथील अलीम मोहद्दिन मुसा आणि रायगड जिल्ह्यातील पाली येथील प्रदीप उर्फ दिनेश शंकर रौधळ यांना अटक करण्यात आली होती. आरोपींजवळून बनावट सीडीसींसह काही वैध पासपोर्टही पोलिसांनी हस्तगत केले होते. आरोपींच्या चौकशीतून पोलिसांनी त्यांच्या केरळमधील हस्तकाची माहिती मिळवली. त्यानुसार केरळमधून विजेश अल्याकल यालाही अटक करण्यात आली. अल्याकलची रवानगी सोमवारी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सद्य:स्थितीत पाचही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही हस्तकांची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचे जाळे आंध्र प्रदेश आणि ओडिशातही पसरले असून, या राज्यांमधील काही आरोपींची तपशीलवार माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक लवकरच रवाना होण्याची शक्यता आहे.आरोपी दिनेशकडून पोलिसांनी आणखी काही उमेदवारांची कागदपत्रे जप्त केली. त्यावर उमेदवारांचे पत्ते मदुराई, जम्मू, पाटना, गाझियाबाद, चेन्नई इत्यादी शहरांमधील आहेत. या कागदपत्रांवरील उमेदवारांची छायाचित्रे खरी असली, तरी इतर तपशील खोटा असल्याचे जाणवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या उमेदवारांचा तपशील काढणे सुरू असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले.
ठाण्यातील बनावट सीडीसीचे आंध्र प्रदेश, ओडिशा कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:38 AM