लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मागील आठवड्यात बनावट कोरोना अहवाल देणाऱ्या मैहफुज पॅथॅलॉजी लॅबवर भिवंडी गुन्हे शाखेने छापा टाकून काेराेनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्याचा पर्दाफाश केला हाेता. तेथे साईधाम लॉजेस्टिक कुकसे येथील सुमारे ५०० कामगारांचे आधार कार्ड झेरॉक्स रिपोर्टसाठी घेतल्याचे आढळले हाेते. या लॅबसह अनेक लॅबनी अशा बनावट पद्धतीने काेरोना निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट गोदाम कामगारांना दिले आहेत. या बनावट रिपोर्टच्या आधारे असंख्य बाधित रुग्ण कामावर येत असल्याने त्यांच्या संपर्कातून इतरांना लागण होऊन ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातही दररोज शेकडोंनी बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात गोदामात काम करण्यासाठी ठिकठिकाणांहून कामगार येतात. यासाठी ते बनावट काेराेना अहवाल तयार करून घेत असल्याचे नुकतेच उघड झाल्याने हे कामगार काेराेना फैलावासाठी कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त हाेत आहे. याकडे शासन, प्रशासनासह स्थानिक ग्रामपंचायतीही लक्ष देत नसल्याने ही परिस्थिती भविष्यात भयावह हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गोदाम पट्ट्यातील कंपन्यांनी स्वखर्चाने कामगारांची कोरोना तपासणी अधिकृत लॅबमार्फत करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे बनावट अहवालांना चाप बसून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मदत मिळणार आहे.