लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा रोड येथील आयडीबीआय बँकेत मोटार कारसाठी कर्ज घेण्याच्या नावाखाली बनावट कागदपत्रे बनवून बँकेची १७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आयडीबीआय बँकेत काम करणाऱ्या कर्मचारी यांना जानेवारी २०२१ मध्ये बोरिवली येथील विभागीय कार्यालयातून समजले की, मोटारकार कर्जात मुंबईच्या एका शाखेत बँकेची फसवणूक झाली आहे. त्या अनुषंगाने मीरारोडच्या बँकेतील मोटारकार कर्जाच्या प्रकरणाची पडताळणी सुरू करण्यात आली. त्यात कमलेश सत्यनारायण सोनी या व्यक्तीने मोटारकार कर्जासाठी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. २०१९ मध्ये १७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर होऊन २८ हजार १३४ रुपयांचा मासिक हप्ता होता. सोनी याने काही महिने हप्ते भरले व नंतर हप्ते भरलेच नाहीत. अनेक वेळा नोटीस देऊन सुद्धा त्याने पैसे भरले नव्हते. त्याने मोटारकारऐवजी एका रिक्षाचे आरसी पुस्तक बँकेत जमा केले होते. तसेच ज्या ठिकाणाहून गाडी खरेदी केल्याचे दाखवून २२ लाख ११ हजार २२७ रुपयांचे कोटेशन देण्यात आले होते, ते सुद्धा बनावट आढळले.
सुदर्शन मोटार कंपनीची बनावट कागदपत्रे देणाऱ्या संतोष कांबळे व जयेश अशोकन सह कमलेशवर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.