उल्हासनगर : विद्यापीठाच्या स्थलांतर प्रमाणपत्र पडताळणीत शहरातील एसएसटी कॉलेजच्या १२ विद्यार्थाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होऊन विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांनी दोन दिवसात पोलीस ठाण्याला बाजू मांडणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उल्हासनगर मोर्यानगरी परिसरात एसएसटी कॉलेज असून सन-२०१८ मध्ये वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांच्या स्थलांतर प्रमाणपत्राची पडताळणी मुंबई विद्यापीठाकडून झाली. या पडताडणीत १२ विद्यार्थाची स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) बनावट असल्याचे उपकुलसचिव अशोक घुले यांच्या निदर्शनात आले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात १२ विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल झाल्यावर एकच खळबळ उडाली. वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षाला प्रवेश घेतांना या १२ मुलांनी मुंबई विक्रोळी येथील एका कॉलेजच्या नावाने बनावट स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) जोडले होते. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत असून एसएसटी कॉलेजचे प्राचार्य जे सी पुरस्वानी यांनी दोन दिवसात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कॉलेजच्या वतीने बाजू मांडणार असल्याची सांगितले.