मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या काशीमीरा येथील बीएसयुपी योजनेत घर मिळवून देण्यासाठी बनावट शिधावाटप पत्रीकेसह अन्य बनावट पुरावे बनवून दिल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी सरकारी शिधावाटप दुकानदारासह अन्य दोघांना अटक केली आहे . तर आणखी दोन आरोपी फरार आहेत. मोठ्या संख्येने लाखो रुपये उकळून बनावट शिधावाटप पत्रिका सदर दुकानदाराने बनवून दिल्याचा संशय आहे. योजनेत सर्वेक्षणा पासूनच मोठ्या प्रमाणात घोटाळे - गैरप्रकार असल्याचे आरोप होत आले आहेत.
मीरा भाईंदर महापालिकेने काशीमीरा डोंगरी येथील जनता नगर व काशी चर्च झोपडपट्टी मध्ये बीएसयुपी योजना राबवली आहे. झोपड्यांच्या जागेवर इमारती उभ्या करून लाभार्थ्यांना पक्की घरे दिली जात आहेत. मात्र सदर योजनेत सदनिका लाटण्यासाठी सर्वेक्षणातीळ गैरप्रकार पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची नावे पालिकेने वगळली देखील आहेत.
दरम्यान गुरुवार २२ जून रोजी दहिसर येथे राहणारे दयाराम भारती यांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी हरिहर चौहान, मंगल मिठाईलाल गांधी, दयाशंकर राजदेव यादव, आशिष नगीना चौहान आणि अमृतलाल पाल ह्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यापैकी हरिहर, मंगल व दयाशंकर याना अटक केली असून ठाणे न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशिष व अमृतलाल हे फरार झाले आहेत.
दयाराम यांना बीएसयुपी योजनेत फ्लॅट मिळवून देतो सांगून आरोपींनी २०१५ साली दयाराम यांच्या नावाने बनावट १९९९ सालचा हरिश्चंद्र कोठारी कडून घर खरेदीचा करारनामा व शिधावाटप पत्रिका बनवून दिली. त्या बदल्यात दयाराम यांच्या कडून ७ लाख रुपये घेण्यात आले. काही दिवसानी आशिषने महापालिकेचा शिक्का असलेले बीएसयूपी योजनेचे झोपडपट्टीधारकांचे सर्वेक्षण गणना पत्रक दिले. घराची मागणी करून देखील आरोपी हे टाळाटाळ करत असल्याने दयाराम यांना संशय आला. त्यांनी शिधावाटप पत्रिका व पालिकेचे गणना पत्रक आदींची पडताळणी केल्या नंतर सदर कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले.
उपनिरीक्षक अमोल जाधव या गुन्ह्याचा तपास करत असून अन्य काही फसले गेलेले लोक देखील समोर येत असल्याने फसवणूक झालेल्यांची संख्या वाढणार आहे. पोलिसांनी दबावाला न जुमानता प्रभावीपणे चौकशी करून कारवाई होणे अपेक्षित असल्याचे फसलेल्या लोकांचे म्हणणे आहे.