ठाणे : नामांकित ब्रॅण्डच्या बाटलीत दमणनिर्मित हलक्या दर्जाचे मद्य भरून तयार केलेल्या बनावट मद्याच्या साठ्यासह वाहन असा एक लाख ९३ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने कारवाईत जप्त करून वाहनचालक अखिलेश मनीरामसिंह चौहान याला बुधवारी सकाळी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अवैधरीत्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभाग आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांना मिळाली होती. त्यानुसार, विभागीय उपायुक्त तानाजी साळुंखे, राज्य दक्षता विभाग व अंमलबजावणी संचालक सुनील चव्हाण, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कणसे यांच्या पथकाने भिवंडी येथील येवईनाका येथे पकडलेल्या चारचाकी वाहनासह इम्पिरियल ब्ल्यू व्हिस्कीचे १८० मिलीचे ११ बॉक्स, मॅक्डॉवेल नंबर १ व्हिस्कीचे १८० मिलीचे चार बॉक्स असे १५ बॉक्स आणि कार असा दारूबंदी गुन्ह्याखाली मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई दुय्यम निरीक्षक संजय पुरळकर व विजय धुमाळ आणि जवान केतन वझे, नारायण जानकर, संदीप धुमाळ, कुणाल तडवी यांनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय पुरळकर करत आहेत.
बनावट मद्याचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:16 AM