कल्याण : कोरोनाकाळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतले गेल्याच्या अनेक तक्रारी येत असताना कल्याण येथील गुप्ते चौकातील ‘फला-ए-आम’ ट्रस्टच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या आरोग्यसेवेचा आत्तापर्यंत लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्याचा चंग ट्रस्टने बांधला आहे.
फला-ए-आम ट्रस्ट गेल्या २२ वर्षांपासून ही सेवा देत आहे. ट्रस्टचे विश्वस्त सलमान अख्तर आणि मोईन डोन यांच्या पुढाकाराने हे काम सुरू आहे. ट्रस्टचे विश्वस्त आणि संचालक फुरकान मुरुमकर यांनी सांगितले की, अनेक सामान्य रुग्णांना बड्या खासगी रुग्णालयातील आरोग्यसेवा खिशाला परवडत नाही. त्यांच्यासाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर आम्ही आरोग्यसेवा देतो. आमच्याकडे उच्च दर्जाची मान्यताप्राप्त पॅथॉलॉजी लॅब आहे. रक्तचाचणी, एक्स-रे, सोनाेग्राफी, मॅमोग्राफी, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, फिजिओथेरपी या विविध आरोग्यसेवा पुरविल्या जातात. नुकतीच ट्रस्टने स्ट्रेस टेस्टही सुरू केली. टूडी इको केला जातो. त्याचबरोबर सीटी एमआरआय केला जातो. त्यासाठी उच्च दर्जाची आरोग्य साधनसामग्री आणि अत्याधुनिक मशीनचा वापर केला जातो. या आरोग्यसेवा सगळ्यांसाठी खुल्या आहेत. अन्य खासगी लॅब आणि रुग्णालयात निदान आणि उपचाराकरिता लागणाऱ्या आरोग्यसेवांकरिता आकारल्या जाणाऱ्या दरापेक्षा ४० ते ६० टक्के कमी रक्कम आकारली जाते. त्यामुळे सामान्यांना उपचार करणे खिशाला परवडते. एखाद्या गरीब गर्भवती महिलेची केडीएमसीने शिफारस केल्यास त्या महिलेची सोनोग्राफी मोफत केली जाते. कोरोनाकाळात सामान्यांनी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेतला. त्यामुळे कोरोनाकाळात या ट्रस्टचा सामान्यांना मोठा आरोग्य आधार झाला. लोकवर्गणीतून हा ट्रस्ट चालवला जातो, असे मुरुमकर यांनी सांगितले.
-------------------