- अनिकेत घमंडीडोंबिवली : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाळसे धरले आहे, असा सर्वसाधारण समज असताना रविवारी हिंदू चेतना संगमाच्यानिमित्ताने जमलेल्या नव स्वयंसेवकांना विचारले असता गतवर्षी विजयादशमीच्या उत्सवापासून संघाने हाफपँटमधून फूलपँटमध्ये शिरण्याचा केलेला बदल हेच संघवाढीचे प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाले.संघ हाफपँटचा त्याग करुन फूलपँट परिधान करणार, अशा बातम्या गेल्या काही वर्षांपासून येत होत्या. मात्र त्याला अखेरीस गतवर्षीच्या दसºयाचा मुहूर्त लाभला. हिंदू चेतना संगमाच्यानिमित्ताने गणवेषधारी स्वयंसेवकांची वाढलेली टक्केवारी जाणवण्याजोगी होती. त्यामुळे काही नव्याने स्वयंसेवक झालेल्या तरुणांकडे विचारणा केली असता त्यांनी हाफपँटमध्ये वावरण्याची लाज वाटत असल्याने आम्ही स्वयंसेवक होणे टाळत होतो. मात्र आता गणवेश बदलल्याने अडचण दूर झाली, अशी कबुली दिली.रविवारीच्या चेतना संगमात कल्याण-डोंबिवली परिसरात ५ हजार २४७ स्वयंसेवकांनी, ठाणे परिसरात १७६० स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेष परिधान केला होता. कल्याण परिसरात १४ हजार १६४ तर ठाण्यात २७७६ संघपे्रमींनी कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवली हाच संघाचा बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले असून संघप्रेमींची सर्वाधिक संख्या त्याच पट्ट्यात असल्याचे स्पष्ट झाले.डोंबिवलीत ८ कार्यक्रमांमध्ये १३४१, वसई २८३४, पालघर ४५०, बोईसर आदींसह अन्य ठिकाणी पूर्ण गणवेष घालून स्वयंसेवकांनी रविवारच्या संगमात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यालयात संपन्न झालेल्या उपक्रमात स्वयंसेवकांची संख्या विशेष लक्षणिय होती. त्यात छत्रपती प्रभात या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शाखेने ३८ स्वयंसेवकांवरुन १०७ स्वयंसेवकांचे उद्दीष्ट पूर्ण केले. ठाणे जिल्ह्याच्या आकडेवारीत मुंब्रा ५५, कळवा १२५, कळवा पूर्व १३६, नौैपाडा ५५३, वागळे २४७, पोखरण १७०, घोडबंदर ४७४ असे एकुण १७६० स्वयंसेवक पूर्ण गणवेषात होते तर २७७६ नागरिक सहभागी झाले होते. कल्याण जिल्ह्यात झालेल्या उपक्रमात ६६७९ पुरूष, २२३८ महिला असे सर्वसामान्य कल्याण-डोंबिवलीकर नागरिकही उपक्रमाला आवर्जून उपस्थित होते.गणवेषधारी स्वयंसेवकांची माहिती संकलित करण्याकरिता संघाने गुलाबी रंगाचा, तर सहानुभूतीदार नागरिकांसाठी पांढºया रंगाचा फॉर्म ठेवला होता. त्यांच्या संख्येवरुन गणवेष बदलल्यावर स्वयंसेवकांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाल्याचे दिसून आले. यासंदर्भात डोंबिवलीतील छत्रपती प्रभात शाखेच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांशी चर्चा केली असता स्वयंसेवक वाढले हे उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हाफपँट ते फूलपँट हा बदल झाल्याने युवा वर्ग आकर्षित झाल्याचे ज्येष्ठांनी कबूल केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच होता, त्याचे सकारात्मक बदल आता दिसायला लागले असून आगामी काळात या संख्येत वाढ होणार असल्याचा दावा त्यांनी केला.कल्याण-डोंबिवलीतील भाजपाच्या सर्वच नगरसेवकांनी संघाचा गणवेष घातला होता. गणवेषात संगमाच्या उपक्रमात सगळ््यांनी सहभागी व्हायचे, असे संदेश व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होेते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार यांच्यासह सगळयांनी आवर्जून गणवेषात हजेरी लावली. मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही संघाचा गणवेष घातला होता. शिवसेनेचे शहरप्रमुख, सभागृह नेते राजेश मोरे यांनीही दत्तनगरच्या स्वामी विवेकानंद शाळेतील उपक्रमात उपस्थिती लावली.आयाराम झाले संघ स्वयंसेवकभार्इंदर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अथवा मनसेतून भाजपात आलेल्या आयारामांना रविवारच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू चेतना संगमात संघाचा गणवेश परिधान करण्यास भाग पाडून सहभागी केले होते. राजकीय सोय म्हणून लोक भाजपात प्रवेश घेतात येथवर ठीक आहे. परंतु संघाच्या विचारसरणीशी सूतराम संबंध नसलेले स्वयंसेवक म्हणून कसे मिरवू शकतात, असा सवाल काही कट्टर स्वयंसेवकांनी केला आहे.मीरा-भार्इंदरमधील तीन ठिकाणी आयोजित कार्यक्रमात स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह पक्षातील अनेक आयारामांनी संघाचा पोशाख परिधान केला होता. भार्इंदर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्न विश्वास या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.यापूर्वी कधीही आरएसएसचा काडीमात्र संबंध नसलेल्यांपैकी नाईलाजास्तव पोशाख परिधान करावा लागल्याची चर्चा सुरु आहे. दीर्घकाळ अपक्ष म्हणून राजकारण केलेले भाजपाचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता, राष्टÑवादीतून भाजपात आलेले व विद्यमान उपमहापौर चंद्रकांत वैती, पूर्वाश्रमीचे राष्टÑवादीचे व सध्याचे स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, शिवसेनेतून भाजपात आलेले नगरसेवक प्रशांत दळवी यांच्यासह भाजपातील काही आयाराम नगरसेवक, पदाधिकारी संघाचा गणवेश परिधान करुन कार्यक्रमाला हजर होते.
फूलपँटमुळे संघाने धरले बाळसे; गुलाबी गुपित, डोंबिवली-कल्याणमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:38 AM