मीरारोड : अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी मीरा भाईंदर नगरपरिषद असतानाच्या काळातील बनावट बांधकाम परवानगी सादर करणाऱ्या अजित ठक्कर (रा. हरिदास नगर, बोरिवली) याच्यावर महापालिकेने काही वर्षांनंतर गुन्हा दाखल केला आहे.
मीरारोडच्या क्वीन्स पार्क भागात क्वीन्स बेकरी या नावाने एक मजली इमारत आहे. सदर इमारतीच्या जागेवरून असलेल्या वादात तत्कालीन आयुक्तांनी सुनावणी घेऊन ८ ऑगस्ट २०१६ रोजी आदेश पारित केला होता. त्यात मे. व्ही. पी. डेव्हलपर्सचे अजित ठक्कर यांनी तत्कालीन मीरा भाईंदर परिषदेच्या काळातील ११ जुलै १९९५ रोजीची बांधकाम प्रारंभ परवानगीची छायांकित प्रत सादर केली होती.
नगररचना विभागाने त्यांच्याकडील अभिलेख तपासले असता तशा आशयाची कोणतीच परवानगी दिल्याचे आढळून आले नाही. विशेष म्हणजे २०१६ मधील आयुक्तांच्या आदेशानंतर नगररचना विभागाने २०१९ साली त्यांच्या अहवालास मान्यता दिली होती.
विद्यमान प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी मे. व्ही. पी. डेव्हलपर्सचे विकासक / अधिकारपत्रधारक अजित ठक्करवर बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
........
वाचली