उल्हासनगर : महापौरपदाची निवडणूक जुलैमध्ये होणार असून ते पद ओमी टीमला देण्याचे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे ओमी कलानी यांचे म्हणणे आहे. मात्र, हे पद ओमी टीमकडे जाऊ नये, म्हणून विरोधक राजकीय विरोधातून माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करू शकतात, अशी भीती ओमी कलानी यांनी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी पोलीस उपायुक्तांना निवेदन सादर केले आहे.उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाच्या महाआघाडीची सत्ता आहे. महापालिकेत सत्तास्थापनेच्या वेळी ओमी टीमला सव्वा वर्षासाठी महापौरपद देण्याचे ठरले होते. भाजपाच्या मीना आयलानी यांची महापौरपदाची सव्वा वर्षाची मुदत ५ जुलैला संपत आहे. त्यानंतर, ओमी टीमला महापौरपद मिळण्याची आशा ओमी यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, महापौर आयलानी यांनी महापौरपदाची मुदत अडीच वर्षांची असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. महापौरपदावरून आयलानी व कलानी आमनेसामने आले असून राजकीय विरोधातून माझ्यावर खोटे गुन्हे व तक्रारी करण्याची भीती ओमी यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली आहे. या मुलाखतीत त्यांनी एका काँग्रेस नेत्याचे नाव घेतले आहे. ही त्यांची मुलाखत व्हायरल झाली आहे.महापालिका निवडणुकीपूर्वी संपूर्ण शहर ओमी कलानी टीममय झाले होते. ओमी टीम बाजी मारून महापालिकेत सत्ता मिळवेल, असे वातावरण निर्माण झाले होते. याचाच फायदा भाजपाने उठवत शिवसेनेसोबत काडीमोड घेऊन ओमी टीमसोबत महाआघाडी केली. भाजपा व ओमी टीमचे ७८ पैकी ३३ नगरसेवक निवडून आले.मात्र, सत्ता स्थापनेला बहुमत कमी पडते, असे लक्षात येताच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी क्षणाचा विलंब न लावता साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट घडवून आणून सत्तेत सहभागी करून घेतले. तसेच उपमहापौरपदासह स्थायी समिती सभापती, विशेष व प्रभाग समितीची सभापतीपदे दिली. मात्र, सत्तेतील सर्वात मोठ्या सहभागी असलेल्या ओमी टीमला सतत सत्तेपासून दूर ठेवल्याने नाराजी निर्माण झाली आहे. ओमी टीमला महापौरपद मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.>भाजपा-साई पक्षाची गट्टी?ओमी कलानी टीमला म्हणजे कलानी कुटुंबाला महापालिकेतील सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपातील एक गट नेहमी सक्रिय राहिला. मात्र, सद्य:स्थितीत भाजपातील सर्व गटतट कलानी कुटुंबाविरोधात एकत्र आल्याचे चित्र असून साई पक्षाने त्यांना सहकार्य केले आहे. त्यामुळे ओमी टीमची पुरती कोंडी झाली आहे. महापौरपदासह विधानसभा निवडणुकीत आमदारपदाचा उमेदवार कोण, यावरही चर्चा सुरू झाली आहे.>निवडणुकीचे मला माहीत नाहीयासंदर्भात भाजपाचे माजी आमदार कुमार आयलानी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, महापौरपदाची निवडणूक पुढील महिन्यात आहे, हे मला ठाऊक नाही. ओमी कलानी यांनी काय विधान केले, याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. तर, काँग्रेसचे जयराम लुल्ला यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 2:29 AM