भिवंडी : लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून यंदा १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात राजकीय पक्षांचे आठ उमेदवार आहेत, तर सात अपक्ष उमेदवार आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या भिवंडीत २००९ मध्ये एकूण १६ उमेदवारांपैकी सहा अपक्ष उमेदवार रिंगणात होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तीन अपक्ष उमेदवार होते.नेहमी निवडणुकीत नाराजीतून अथवा बंडखोरीतून अपक्ष म्हणून उमेदवार पुढे येताना दिसतात. मात्र, भिवंडीत तसे दिसून येत नाही. २००९ च्या निवडणुकीत अपक्षांना विजयी उमेदवाराच्या मार्जिनपेक्षा जास्त मते मिळाली. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना सुमार मते मिळाली.२००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे व भाजपचे जगन्नाथ पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. त्यामध्ये भाजपचे जगन्नाथ पाटील यांना एक लाख ४१ हजार ४२५ मते मिळाली, तर काँग्रेसचे सुरेश टावरे यांना एक लाख ८२ हजार ७८९ मते मिळाली. ४१ हजार ३६४ मताधिक्याने टावरे विजयी झाले. त्यावेळी अपक्षांना मिळून एकूण ९५ हजार ४८५ मते मिळाली होती. मात्र, या अपक्षांमधील उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी ७७ हजार ७६९ अशी विजयी उमेदवाराच्या मार्जिनपेक्षाही जास्तीची मते घेतली, तर समाजवादीचे उमेदवार आर.आर. पाटील यांनी ३२ हजार ७६७ मते मिळवून या मार्जिनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही पहिली निवडणूक असल्याने त्याचा अंदाज घेऊन २०१४ च्या दुसऱ्या निवडणुकीत उमेदवारांचा सहभाग होता.२०१४ च्या दुसºया निवडणुकीत एकूण १३ उमेदवार निवडणुकीत उभे होते. त्यावेळी तीन उमेदवार अपक्ष होते. त्यावेळी भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांच्यात लढत झाली. कपिल पाटील यांना चार लाख ११ हजार ७० मते मिळाली. तर, विश्वनाथ पाटील यांना तीन लाख एक हजार ६२० मते मिळाली आहेत. कपिल पाटील हे एक लाख नऊ हजार ४५० च्या मताधिक्याने निवडून आले. तर, अपक्षांना नऊ हजार ९९९ मते मिळाली होती. ती विजयी उमेदवाराच्या मार्जिनच्या कोसो दूर होती.
अपक्षांच्या मतांच्या टक्केवारीत भिवंडीत चढउतार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 1:38 AM