वाडा : सोनाराला बनावट सोने विकून २ लाख 90 हजार रुपायांचा गंडा घालून दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चौधरी यांचे बस स्थानकाजवळ कन्हैय्या ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ५ मार्च रोजी मुकेश नायक व हरिसिंग नायक नामक दोन इसम १०४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (पुतळ्या) विक्री करण्यासाठी त्यांच्या दुकानात आले होते. यावेळी मकराराम चौधरी यांच्या समक्ष मुत्थुट फायनान्समार्फत या सोन्याची तपासणी केली असता ते खरे असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्यावेळी चौधरींकडे २ लाख ९० हजार रुपये ऐवढी रक्कम नसल्याने हा व्यवहार पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार १५ दिवसांनंतर पुन्हा हे दोघे सोने घेऊन चौधरींकडे आले असता चौधरींनी अडीच लाखांची रोख रक्कम व दुकानातील ४० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या वस्तू देऊन हा व्यवहार पूर्ण केला. मात्र त्यानंतर त्यांनी या सोन्याची तपासणी केली असता त्यांना धक्काच बसला. आरोपींनी प्रत्यक्ष व्यवहारावेळी खऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या हुबेहूब वर्णनाचे बनावट दागिने टेकवून फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तक्र ार दाखल केली त्यानुसार मुकेश नायक व हरिसिंग नायक यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.(वार्ताहर)
बनावट सोने : सोनाराला २.९० लाखाचा गंडा
By admin | Published: April 01, 2017 11:30 PM