डोंबिवली : रेल्वे स्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीतील फेरीवाले हटविण्यात केडीएमसीच्या पथकाला यश आले असलेतरी हद्दीच्या बाहेर कारवाई करताना पथकाकडून दुजाभाव होत असल्याने फेरीवाल्यांमध्ये असंतोष आहे. हप्ते देणाऱ्यांना मात्र कारवाईतून वगळले जात आहे. हद्दीच्या बाहेरही आमच्यावर कारवाई होत असल्याने आम्ही पोट भरायचे तरी कसे?, असा सवाल फेरीवाले करत आहेत.
महापौर विनीता राणे यांनी जातीने लक्ष घातल्याने डोंबिवली रेल्वेस्थानक परिसर फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त झाला आहे. त्यामुळे फेरीवालाविरोधी पथकाने १५० मीटर हद्दीबाहेर व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. मात्र, यावेळी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून होत आहे. या कारवाईदरम्यान हप्तेबाजी जोरात सुरू असल्याने काहींना आपसूकच अभय मिळाल्याचे चित्र १२ आॅक्टोबरला कारवाईदरम्यान पूर्वेतील दत्तनगर भागात पाहावयास मिळाले. काहींचा माल उचलला गेला असताना काही हातगाड्यांना मात्र व्यवसायास मुभा दिल्याने पथकांच्या कारवाईवरच शंका उपस्थित झाल्याचे फेरीवाल्यांचे म्हणणे आहे. सरसकट सर्वांवर कारवाई करा, अशी मागणी होत आहे. परंतु, हद्दीच्या बाहेर होणारी कारवाईही चुकीची असल्याचे मत काही फेरीवाल्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, कारवाईत दुजाभाव केला जात नाही. अतिक्रमण करणाºया सर्वच हातगाड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. हप्ते देणाºयांना अभय मिळते असा आरोप करणाºयांनी पुरावे द्यावेत, नाहक बिनबुडाचे आरोप करू नयेत, असे ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले.