ठाणे : ठाण्यात ९ मे २०१९ रोजी एसटीपी टाकीत मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नुकसान भरपाईचा दहा लाख रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सचिव नारायण दास यांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिका अधिकारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत नारायण दास, सल्लागार पूर्ण लाल, ठामपा उपआयुक्त (मुख्य) विजयकुमार म्हसाळ, उपआयुक्त अशोक बुरपुले, सहायक आयुक्त शंकर पाटोळे, श्रमिक जनता संघाचे चिटणीस व सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, म्युनिसिपल लेबर युनियनचे सरचिटणीस बिरपाल भाल, सेक्रेटरी चेतन आंबोणकर व साधना गहनवाल आदी उपस्थित होते. मृत पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळत असली तरीदेखील एसटीपी टाकीत मरता मरता वाचलेल्या पाच सफाई कामगारांच्या पुनर्वसनाची मागणी यावेळी जगदीश खैरालिया यांनी केली. केंद्र सरकारने २०१३ साली केलेल्या मॅन्युल स्केवेंजीग कायद्यानुसार व सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार १९९३ पासून मैला सफाईच्या कामात लिप्त असलेल्या सफाई कामगारांचा शोध घेऊन त्यांना चाळीस हजार रुपये रोख मदत देणे व अन्य सम्मानजनक व्यवसायात पुनर्वसन करणेबाबत शासनाने योजना राबवावी, असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाला अशा सूचना देण्याचे दास यांनी मान्य केले.
ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देताना जातीचा दाखला सादर करण्याची अट रद्द करा, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी बैठकीत दिले आहे. सेवानिवृत्तीनंतर सफाई कामगारांना श्रमसाफल्य योजनेतील घर देण्यासाठी २५ वर्षे सेवा पूर्ण करण्याची अट शिथिल करण्याची मागणी युनियनतर्फे करण्यात आली. कोविडमुळे मृत सफाई कामगारांच्या वारसांना ताबडतोब कामावर घ्या, सरकारने जाहीर केलेली अनुदानाची रक्कम अदा करा, पूर्वीपासून कार्यरत रस्ता सफाई, फायलेरियामधील कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर हजर करून घेण्याची मागणी यावेळी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केली.